मुंबई : मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार, असा निर्धार भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) व्यक्त करीत असले, तरी महापौर कोणाचा होणार, हा कळीचा मुद्दा आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपचाच महापौर होणार, असा चंग भाजपने बांधला असून शिंदे गटाने मात्र शिवसेनेचाच महापौर असावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच महापौरपदासाठीही भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच होणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महायुती एकत्रित लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार सांगत असले, तरी मुंबई व्यतिरिक्त अन्य महापालिका, जिल्हा परिषदा व नगरपालिकांमध्ये युती होणे अवघड आहे. मुंबईत शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाची ताकद असल्याने भाजप व शिंदे यांना युती करावी लागण्याची शक्यता आहे. पण मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच महापौरपदासाठी भाजप-शिवसेनेत संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
महापौर भाजपचा होणार, पालिकेवर भगवा फडकावणार, असे फडणवीस, ज्येष्ठ भाजप नेते व मंत्री आशिष शेलार आणि शिंदेंसह शिवसेनेतील नेते सांगत आहेत. ठाकरे गटाचे बरेच नगरसेवक शिंदे गटात आले आहेत. त्यामुळे जागावाटपात शिंदे गटाला भाजपपेक्षा अधिक जागा हव्या आहेत. त्याचबरोबर महापौरही शिवसेनेचाच असावा, असा शिंदे गटाचा आग्रह आहे. शिवसेनेत बंड केल्यावर शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले होते व गेल्यावर्षीही विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यावर शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळावे, असा आग्रह होता. पण भाजपला अधिक जागा मिळाल्याने भाजपने शिंदेंचा हट्ट मान्य न करता फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद दिले.
ठाकरेंशी फारकत घेतल्यावर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला शिंदे गट सामोरे जाणार असून अटीतटीची लढत होणार आहे. गेली अनेक वर्षे पालिकेवर असलेली ठाकरेंची सत्ता उलथून टाकण्याचा भाजप व शिंदे यांचा निर्धार आहे. राज्यात नमते घेवून शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले, आता भाजपने तडजोड करून मुंबईत शिंदे गटाला महापौरपद द्यावे, असा नेत्यांचा आग्रह आहे. राज्यात फडणवीस यांच्याबरोबर सत्तेत असताना २०१७ मध्ये भाजपने शिवसेनेला महापौरपदासह पालिकेची सर्व सत्ता दिली होती. राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी भाजपने तेव्हा ज्याप्रमाणे तडजोड केली, ती आताही करून शिवसेनेला महापौरपद द्यावे, असा शिंदे गटाचा आग्रह राहणार आहे. त्यामुळे महापौरपदावरून भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.