Bihar Election 2025 बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. भाजपाने निलंबित केलेल्या अभिनेत्याला पुन्हा पक्षात घेतले आहे. भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांची पक्षात पुन्हा ‘घरवापसी’ झाली आहे. अभिनेत्याची पार्श्वभूमी वादग्रस्त असूनही आणि पत्नीच्या गंभीर आरोपांनंतरही भाजपा या अभिनेत्याला तिकीट देण्यावर ठाम होते. मात्र, शनिवारी त्यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. हा भाजपासाठी धक्का मानला जात आहे. यामागील कारण काय? पवन सिंह नक्की काय म्हणाले? पत्नीने त्यांच्यावर काय आरोप केले? जाणून घेऊयात…

पवन सिंह यांनी काय म्हटले?

  • भोजपुरी गायक अभिनेता पवन सिंह यांनी शनिवारी स्पष्ट केले की, त्यांनी बिहार विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी भारतीय जनता पक्षात (भाजपा) प्रवेश केलेला नाही आणि त्यांचा निवडणूक लढवण्याचा कोणताही इरादा नाही.
  • सिंह यांनी ‘एक्स’ वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिले, “मी, पवन सिंह, माझ्या भोजपुरी समाजाला हे सांगू इच्छितो की, मी बिहार विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी कोणत्याही पक्षात सामील झालो नाही आणि ना माझा त्या लढवण्याचा हेतू आहे. मी पक्षाचा एक सच्चा सैनिक आहे आणि तसाच राहीन.”
  • सिंह यांनी पक्षाशी आपली निष्ठा व्यक्त केली आणि स्वतःचे वर्णन एक ‘सच्चा सैनिक’ म्हणून केले.
भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांची पक्षात पुन्हा ‘घरवापसी’ झाली आहे, मात्र निवडणूक लढवण्यापासून त्यांनी माघार घेतली आहे. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहीत)

‘पॉवर स्टार’ म्हणून ओळखले जाणारे आणि युवावर्गात प्रचंड लोकप्रिय असलेले पवन सिंह यांना मे २०२४ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार असलेल्या काराकाट लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्याबद्दल पक्षातून निष्कासित करण्यात आले होते. त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे युतीच्या मतांचे विभाजन झाले, ज्यामुळे कुशवाहा यांचा पराभव झाला आणि विरोधी पक्षाचे सीपीआय-एमएलचे उमेदवार विजयी झाले.

वैवाहिक वादामुळे पवन सिंह अडचणीत

पवन सिंह सध्या पत्नी ज्योती सिंह यांच्याबरोबर सुरू असलेल्या वैवाहिक वादामुळे चर्चेत आहे. ८ ऑक्टोबर रोजी दोघांनी स्वतंत्र पत्रकार परिषदा घेतल्या, ज्यात एकमेकांवर धक्कादायक आरोप केले आणि प्रत्येकाने आपापली बाजू मांडली. मुंबईत माध्यमांशी बोलताना ज्योती सिंह यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल काही गंभीर दावे केले. त्यांना अनेक वेळा गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या आणि भावनिक तसेच शारीरिक छळ सहन करावा लागला, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

यावर पवन सिंह यांनी त्याच संध्याकाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली, ज्योतीच्या दाव्यांना एकतर्फी सांगून त्यांनी सर्व दावे फेटाळून लावले. ते म्हणाले, “मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्योती सिंहने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते की ती मला भेटायला लखनऊला येत आहे. मला तिच्या हेतूची कल्पना होती आणि मी प्रशासनाला माहिती दिली होती. माझे भाऊ ऋतिक आणि धनंजय यांच्याबरोबर आम्ही एका फ्लॅटवर भेटलो, तर ज्योतीबरोबर तिचा भाऊ आणि मोठी बहीण जुही होते. माझे तिच्याशी कसे वागणे होते हे फक्त मला, तिला आणि देवाला माहीत आहे.”

पत्नीने घेतली प्रशांत किशोर यांची भेट

पवन सिंह यांच्या पत्नी ज्योती सिंह यांनी शुक्रवारी आगामी बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वी जन सुराजचे प्रमुख प्रशांत किशोर यांची भेट घेतली. त्या पवन सिंह यांच्या दुसऱ्या पत्नी असून त्यांनी त्यांच्यावर विवाहबाह्य संबंधांचेही आरोप केले आहेत. त्यांनी पटना येथील शेखपुरा हाऊसमध्ये प्रशांत किशोर यांची भेट घेतली. यापूर्वी पवन सिंह यांनी आरोप केला होता की, त्यांची पत्नी त्यांच्यावर निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी दबाव आणत आहे.

परंतु ज्योती सिंह यांनी सांगितले की, त्यांनी कसून तयारी केली आहे आणि जर त्यांना संधी मिळाली तर त्या निवडणूक लढवतील. “मी गेल्या वेळी त्यांना खूप मदत केली होती, त्या परिसरात माझ्या चपला झिजवल्या होत्या. जर मला निवडणूक लढवायची असेल तर मी लढवेन. मी खूप कष्ट घेतले आहेत आणि लोकांना ते माहीत आहे,” असे त्यांनी मंगळवारी ‘एनडीटीव्ही’ला सांगितले.

पवन सिंह भाजपासाठी महत्त्वाचे का?

भोजपुरी स्टार पवन सिंह शाहाबाद प्रांतातून येतात, जो बिहारचा ऐतिहासिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे. त्याला ‘भोजपूर प्रदेश’ असेही म्हणतात. त्यात भोजपूर, आर्रा, रोहतास, सासाराम, कैमूर-भभुआ व बक्सर या जिल्ह्यांचा समावेश आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत या भागांत भाजपाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. येथील एकूण २२ जागांपैकी एनडीएला फक्त आठ जागा जिंकता आल्या होत्या. उर्वरित १४ जागांवर विरोधी पक्षाच्या ‘महागठबंधन’ने विजय मिळवला होता, ज्यामुळे या प्रदेशाची जागा सत्ताधारी आघाडीसाठी खूपच कमकुवत ठरली.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही या प्रदेशातील पाचपैकी चार लोकसभा जागा (आरा, काराकाट, औरंगाबाद व सासाराम) एनडीएने गमावल्या. या पराभवासाठी सिंह यांचे निलंबन आणि राजपूत व कुशवाह यांच्यातील उघड संघर्ष कारणीभूत ठरला. या भोजपुरी स्टारचा प्रभाव निर्विवाद आहे. विशेषतः भोजपुरी भाषिक पट्ट्यात, मोठ्या मतदार गटाला एकत्र करण्याची त्यांची क्षमता भाजपासाठी फायद्याची आहे. याव्यतिरिक्त, प्रभावशाली राजपूत समाजातील एक प्रमुख नेता म्हणून त्यांची प्रतिमा भाजपाला भोजपूर प्रदेशातील मुख्य मतदारसंघांमध्ये पाठिंबा मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. परंतु, आता पवन सिंह यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने भाजपाची पुढील रणनीती काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.