What is the Maharashtra seat that Rahul Gandhi spoke about: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (तारीख १८ सप्टेंबर) राजधानी दिल्लीत जाहीर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी भाजपासह निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा मतचोरीचे आरोप केले. कर्नाटकमधील आळंद आणि महाराष्ट्रातील राजुरा या दोन विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप राहुल यांनी केला. आळंदमध्ये स्वयंचलित सॉफ्टवेअरचा वापर करून मतदारांची नावे वगळण्यात आली; तर राजुरा मतदारसंघात सहा हजार ८५० बनावट मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. विदर्भातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यातील राजुरा हा एक महत्वाचा मतदारसंघ आहे.
१९९६ पासून राजुरा मतदारसंघ काँग्रेस किंवा भाजपाच्या ताब्यात राहिलेला आहे. गेल्या काही निवडणुकांत दोन्ही पक्षांमध्ये या मतदारसंघात चुरशीच्या लढती पाहायला मिळालेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेसमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली होती. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला राज्यभरात मोठा फटका बसला होता. चंद्रपूरमध्ये भाजपा उमेदवाराचा तब्बल दोन लाख ६० हजार मतांनी पराभव झाला होता. विशेष बाब म्हणजे, राजुरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी भाजपाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात ५८ हजार ३४९ मतांची मोठी आघाडी घेतली होती. या निवडणुकीत काँग्रेसला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच सहा विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली होती.
राजुरा विधानसभा निवडणूक वादाच्या भोवऱ्यात
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीतही चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाला मोठे यश मिळेल अशी अपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांना होती. मात्र, विधानसभा निवडणुकीचा निकाल पूर्णपणे पालटल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत राजुरा विधानसभा मतदारसंघातून मोठी आघाडी मिळवणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत मात्र पराभवाचा सामना करावा लागला. भाजपाचे उमेदवार देवराव विठोबा भोंगले यांनी या जागेवर अत्यंत कमी फरकाने विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांचा अवघ्या तीन हजार ०५४ मतांनी पराभव केला. या अनपेक्षित पराभवानंतर काँग्रेसने ‘ही निवडणूक मुक्त आणि निष्पक्ष नव्हती’ असा आरोप केला.
आणखी वाचा : Visual Storytelling : राहुल गांधी यांना निवडणूक आयोगातूनच मदत? भाजपाला कोण आणतंय अडचणीत?
काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपावर काय आरोप केले?
लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांनी केला. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर अवघ्या पाच महिन्यात राजुरा विधानसभा मतदारसंघात तब्बल ५५ हजार मतदार वाढले, असा दावा सपकाळ यांनी केला. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, “१ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२४ या काळात राजुरा मतदारसंघात तब्बल ११ हजार ६६७ बनावट मतदारांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. आमचे उमेदवार सुभाष धोटे यांनी त्यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली. त्यानंतर काही मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आणि एफआयआरदेखील दाखल करण्यात आली. मात्र दुर्देवाने पुढे काहीच कारवाई झाली नाही.”
माजी आमदार सुभाष धोटे यांनी काय दावा केला?
काँग्रेसकडून बनावट नोंदींसाठी वापरलेले आयपी अॅड्रेस, ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक उघड करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, आजतागायत ही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, असेही लोंढे म्हणाले. दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी असा दावा केला की- राजुरा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये अनेक मतदारांची बनावट नावे होती. मतदार याद्यांमधील झपाट्याने वाढणारी नोंदणी आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली. काही मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. राजुरा मतदारसंघातील गैरप्रकाराची माहिती दिल्यास चोर कोण, हे उघड होईल म्हणून पोलीस व प्रशासन माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही धोटे यांनी केला आहे.
राहुल गांधी राजुरा मतदारसंघाबाबत काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील राजुरा आणि कर्नाटकमधील आळंद मतदारसंघात कसे मतदार वाढवण्यात आले याचे पुरावे सादर केले. “राजुरा विधानसभा मतदारसंघात हजारो नावे वगळण्यात आली आणि नव्याने सहा हजार ८५० नावे वाढवण्यात आली. मतांची चोरी केल्याचे स्पष्ट पुरावे आमच्याकडे आहेत. हाच प्रकार महाराष्ट्रासह कर्नाटक आणि हरियाणामध्ये घडला आहे,” असे राहुल गांधी म्हणाले. त्यांनी आणखी एक उदाहरण देताना सांगितले की, कर्नाटकमधील एका विधानसभा मतदारसंघात सहा हजार १८ मते हटवली गेली. जेव्हा एका बीएलओच्या (Booth Level Officer) काकांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले, तेव्हा घडलेला सर्व प्रकार त्यांच्या लक्ष आल्याचे राहुल यांनी सांगितले.
राजुरा विधानसभा मतदारसंघाचा इतिहास
मतदार यादीतील कथित अनियमिततेच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या राजुरा विधानसभा मतदारसंघाचा एक मोठा आणि रंजक राजकीय इतिहास आहे. १९६२ मध्ये स्थापन झालेल्या या मतदारसंघात आतापर्यंत १३ निवडणुका झाल्या आहेत. त्यापैकी सात निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे. १९६२ मध्ये या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विठ्ठलराव धोटे यांनी विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर १९६७ मध्ये हा मतदारसंघ अपक्ष उमेदवार एस. बी. जीवतोडे गुरुजी यांच्या ताब्यात गेला. १९७२ मध्ये विठ्ठलराव धोटे यांनी पुन्हा या मतदारसंघात विजय मिळवला; तर १९७८ मध्ये या मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार बाबुराव मुसळे विजयी झाले. १९८० आणि १९८५ मध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रभाकर ममुलकर यांनी सलग दोनदा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला. १९९० आणि १९९५ मध्ये मात्र भाजपाचे उमेदवार वामनराव चाटप यांनी विजय मिळवला.
१९९९ मध्ये काँग्रेसचे सुदर्शन निमकर यांनी हा मतदारसंघ परत काँग्रेसच्या ताब्यात आणला. २००४ मध्ये भाजपाचे वामनराव चाटप पुन्हा विजयी झाले; तर २००९ मध्ये काँग्रेसचे सुभाष धोटे यांनी पहिल्यांदाच या मतदारसंघात विजय मिळवला. २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेवर स्वार होत भाजपाचे उमेदवार संजय धोटे यांनी काँग्रेसच्या ताब्यातून हा मतदारसंघ हिसकावून घेतला. पुढे २०१९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी ही जागा पुन्हा जिंकली. मात्र, गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार विठोबा भोंगळे यांनी धोटे यांचा पराभव करून ही जागा भाजपाकडे पुन्हा खेचून आणली. विशेष बाब म्हणजे, लोकसभा निवडणुकीत राजुरा मतदारसंघात काँग्रेसने मोठी आघाडी घेतली होती. मात्र, तरीही त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे राजुराचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.