नवी मुंबई : ‘नवी मुंबईचे शत्रू शहरातले नाहीत तर बाहेरचे आहेत’ अशी जाहीर भूमिका घेत भाजप नेते आणि राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर तोफ डागल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. ‘नवी मुंबईकरांचे पाणी पळविणारे कोण होते?’, ‘शहरातील मोकळ्या भूखंडांचा बिल्डरांसाठी घास कुणी घेतला?’ अशा प्रश्नांची सरबत्ती करत मागील २५ वर्षांपेक्षा अधिक काळ शहरात सत्ताधीश म्हणून वावरणाऱ्या नाईकांनी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मात्र आतापासूनच विरोधकाच्या भूमिकेत जाऊन शिंदेसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री पद असल्यापासून नवी मुंबईत नाईक- शिंदे यांच्यात विसंवाद दिसून येत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात नाईक यांनी ‘शहराचे कारभारी ठरविणारे तुम्ही कोण? असा सवाल करत शिंदे यांच्याकडील नगरविकास विभागाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. कल्याण तालुक्यातील १४ गावांचा समावेश नवी मुंबई महापालिका हद्दीत करण्याचा मुद्दाही नाईक आणि शिंदे या दोन नेत्यांमध्ये वादाचा विषय ठरला होता.
नवी मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या विकास आराखड्यात सुविधांसाठी आरक्षित केलेल्या मोक्याच्या भूखंडांचा लिलाव करण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याने नाईक यांनी याविरोधात यापुर्वीच भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या जनता दरबारानंतर माध्यमांशी बोलताना नाईक यांनी ‘ नवी मुंबईचे शत्रू बाहेरच्या शहरातील आहेत’ अशी तोफ डागल्याने हा वार शिंदे यांच्या पक्षावर होता अशी चर्चा आता रंगली आहे.
नवी मुंबईत नाईक विरोधकाच्या भूमिकेत
नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाल्यापासून गणेश नाईक यांची या शहरावर सत्ता राहीली आहे. विधानसभा निवडणुकीत नाईक यांना यापूर्वी पराभव पत्करावा लागला असला तरी येथील महापालिकेवरील त्यांची सत्ता खालसा करण्यात विरोधकांना अजूनही यश आलेले नाही. २०१५ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीने नाईक यांच्या पराभवासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. तेव्हा शरद पवार यांच्या सोबत असलेल्या नाईकांनी नरेंद्र मोदी यांच्या लाटेतही राष्ट्रवादीची सत्ता येथील महापालिकेवर आणली होती.
नवी मुंबईतील राजकीय संघर्षात नाईक नेहमीच सत्ताधारी म्हणून वावरले आहेत. त्यामुळे त्यांच्या कारभारावर टिका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नसत. महापालिकेतील टक्केवारी, घराणेशाही, एककल्ली कारभाराच्या मुद्दयावरुन विरोधकांनी नाईक यांना नेहमीच लक्ष्य केल्याचे यापुर्वी पहायला मिळाले आहे. यंदा मात्र एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या काही निर्णयांचे दाखले देत नाईक शहरात प्रमुख विरोधकाच्या भूमीकेत वावरु लागल्याने शिंदेसेनेची कोंडी करण्यात त्यांना यश मिळत असल्याचे चित्र आहे.
पाणी चोरी, १४ गाव, भूखंड वाटपाचे मुद्दे चर्चेत
नवी मुंबई महापालिकेस एमआयडीसीच्या बारवी धरणातून मिळणाऱ्या पाण्याचा पुरेसा कोटा मिळत नसल्याचा मुद्दा नाईक यांनी जोरकसपणे लावून धरला आहे. नवी मुंबईच्या वाट्याचे पाणी इतर शहरांना वळविण्यात आल्याचा नाईक यांचा आरोप आहे. याशिवाय १४ गावांच्या विकासाचा खर्च नवी मुंबईकरांच्या माथी कशासाठी असा सवाल करत नाईक यांनी यापुर्वीच शिंदे यांची कोंडी केली आहे.
सिडकोमार्फत केले जाणारे भूखंड वाटप, पाणथळ जागांवर सुरु असलेला भराव, डीपीएस तलाव वाचविण्यासाठी होत असलेल्या आंदोलनांना नाईक यांनी पाठींबा दिल्याने नवी मुंबईचे लचके शहराबाहेरील नेते तोडत असल्याचे चित्र उभे करण्यात नाईक कमालिचे यशस्वी ठरले आहे. नाईकांच्या या आक्रमक भूमीकेमुळे त्यांचे कट्टर विरोधक असलेले शिंदेसेनेचे नेते कधीनव्हे ते सत्ताधाऱ्यांच्या भूमीकेत शिरल्याचे चित्र असून शिंदे-नाईक संघर्ष आणखी तीव्र होत असल्याचे चित्र यामुळे उभे राहीले आहे.
नवी मुंबईचे लचके कुणी तोडले हे या शहरातील प्रत्येकाला माहीत आहे. गणेश नाईक हे राज्याचे मंत्री आहेत. नवी मुंबईचे पाणी खरच कुणी चोरले असले तर मंत्री या नात्याने त्यांनी राज्य सरकारकडे दाद मागावी. गेली अनेक वर्ष शहरात सत्ता भोगायची, भ्रष्ट अधिकाऱ्यांमागे स्वत:ची ताकद उभी करायची आणि स्वत:च्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडायचे असला दुटप्पी कारभार नवी मुंबईकर जाणून आहेत. गणेश नाईक हे राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यामुळे शहरातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी नगरविकास विभागाकडे दाद मागावी. रमाकांत म्हात्रे, नेते शिवसेना (शिंदे गट)