तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानी सैन्याने किती राफेल लढाऊ विमाने पाडली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४० कोटी भारतीयांना स्पष्ट करावे, अशी मागणी केली आहे. गुरुवारी हैदराबादमध्ये एका सभेला संबोधित करताना रेवंत रेड्डी आणि भारतीय सशस्त्र दलांवर काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नचिन्हांबद्दल बोलताना त्यांनी भाजपावर टीका केली. या प्रश्नामुळे भाजपा नेतेही आक्रमक झाले. त्यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करत राष्ट्रीय सुरक्षेवर बोलण्याऐवजी ‘मिस वर्ल्ड फोटोशूट करा’, असा सल्ला दिला. नेमका हा वाद काय? जाणून घेऊया.

रेवंत रेड्डी काय म्हणाले?

‘जय हिंद’ रॅलीला संबोधित करताना रेड्डी म्हणाले, पाकिस्तानशी युद्ध करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली, मग पाकिस्तानबरोबर शस्त्रविरामापूर्वी त्यांनी असे का केले नाही. १४० कोटी भारतीयांच्या इच्छेची जाण न ठेवता बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे करण्यात आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) वर ताबा मिळवण्यात मोदी अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. “सिकंदराबाद छावणीतील सैनिकांनी युद्धात भाग घेतला. तेलंगणात तयार होणाऱ्या लढाऊ विमानांनी आपल्या देशाचा आदर राखला. मात्र, नरेंद्र मोदींनी आणलेल्या राफेल विमानांना पाकिस्तानने गोळ्या घातल्या. किती राफेल विमाने पाडली यावर कोणतीही चर्चा नाही. अलीकडच्या युद्धात पाकिस्तानने किती राफेल विमाने पाडली याचे उत्तर नरेंद्र मोदी यांनी द्यावे,” असेही रेड्डी यांनी म्हटले.

रेड्डी यांनी पुढे आरोप केला की, हजारो कोटींचे कंत्राट मोदींच्या जवळच्या लोकांना देण्यात आले. त्यांनी नंतर राफेल विमान खरेदी केले. रेड्डी म्हणाले की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मीनाक्षी नटराजन यांनी फक्त एकच गोष्ट सांगितली. ती म्हणजे, जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा राजकीय बाजू काहीही असली तरी सर्वांनी एकत्र यावे. ते पुढे म्हणाले, “चार दिवसांच्या युद्धानंतर कोणी कोणाला धमकावले आणि कोण कोणापुढे झुकले हे आपल्याला माहिती नाही.

अचानक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प समोर आले, त्यांनी भारताशी बोलून युद्ध थांबवले असे सांगितले.” त्यांनी पंतप्रधान मोदींवर पाकिस्तानला योग्य उत्तर देण्यात अपयशी ठरल्याचा आणि चीनवर ४००० चौरस किलोमीटर भारतीय भूभाग बळकावल्याचा आरोपही केला. रेड्डी म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९६७ मध्ये चीनचा पराभव केला. ते पुढे म्हणाले की, तत्कालीन अमेरिकन सरकारने दिलेल्या धमक्यांना न जुमानता, इंदिरा गांधी १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धादरम्यान आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. त्या मागे हटल्या नाहीत आणि युद्ध जिंकल्या.

“भारताविरुद्ध उभे राहणे हे काँग्रेसच्या डीएनएमध्ये”

भाजपाच्या तेलंगणा युनिटने रेवंत रेड्डी यांच्यावर तीव्र टीका केली आणि त्यांच्यावर राफेल व ऑपरेशन सिंदूरसह प्रमुख संरक्षण मुद्द्यांवर पाकिस्तानच्या भूमिकेचे समर्थन करण्याचा आरोप केला. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये, तेलंगणा भाजपाने आरोप केला की, रेड्डी यांनी राष्ट्रीय सुरक्षा कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि पाकिस्तानला ‘मन पाकिस्तान’ (आमचा पाकिस्तान) असे संबोधले. “त्यांनी सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, आपल्या सशस्त्र दलांची खिल्ली उडवली आणि अग्निपथलादेखील विरोध केला. भारताविरुद्ध उभे राहणे हे काँग्रेसच्या डीएनएमध्ये आहे,” असे ‘एक्स’वर लिहिण्यात आले.

“तुम्ही मिस वर्ल्ड फोटोशूटकडे बघा. राष्ट्रीय सुरक्षा हे तुमचे काम नाही. जेव्हा देश जिंकतो तेव्हा काँग्रेस नाराज होते,” असा आरोपही त्यांनी केला. अलीकडेच हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या मिस वर्ल्ड या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेली ‘मिस इंग्लंड २०२५’ ठरलेल्या मिला मॅगीने स्पर्धेच्या आयोजकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यावरून रेवंत रेड्डी यांच्यावर टीका करण्यात आली.