India vs Pakistan Asia Cup 2025 Cricket Match Shivsena-BJP Controversy : आशिया कप टी-२० स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईच्या मैदानावर पार पडला. या सामन्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (उबाठा) आक्रमक भूमिका दाखवली. मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व क्लब्स यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण करू नये; अन्यथा आंदोलन अधिकच तीव्र केलं जाईल, असा इशारा ठाकरे गटाने दिला. एकीकडे शिवसेनेनं या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी (काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस) या मुद्द्यावर मौन बाळगलं.
भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याआधी शिवसेना ठाकरे गटाने एक आगळी वेगळी मोहीम सुरू केली होती. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील तमाम महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘सिंदूर’ पाठवावा, असे आवाहन करण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे एप्रिलमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते. याच मुद्द्याला हाताशी धरून ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकारला लक्ष्य केले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
“पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या जखमा भरल्या नसताना आणि शहीद जवानांचे रक्त सुकलेले नसताना पाकिस्तानशी क्रिकेट सामना कसा खेळला जाऊ शकतो, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना उपस्थित केला होता. “रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही, असे मोदी म्हणाले होते. पाकिस्तानबरोबर युद्ध सुरू असताना क्रिकेट खेळण्याची परवानगी कशी दिली जाऊ शकते? हे देशभक्तीचे व्यापारीकरण आहे. क्रिकेटला केवळ पैशासाठी परवानगी देण्यात आली आहे. हे अतिशय घृणास्पद आहे. या क्रिकेट सामन्याला शिवसेनेचा विरोध असून ‘माझे कुंकू, माझा देश’, हे आंदोलन रविवारी केले जाणार आहे,” असे ठाकरे म्हणाले होते.
रविवारी ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले, “ज्या हॉटेल्स आणि क्लब्समध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे प्रक्षेपण केले जाईल, त्यांची माहिती सर्वांसमोर आणली पाहिजे. त्याच धर्तीवर मुंबईतील ठाकरे गटाचे पदाधिकारी शरद कोळी हेदेखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचे प्रक्षेपण करणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधील टीव्ही स्क्रीन फोडले जातील, असा थेट इशारा कोळी यांनी दिला.
शिवसैनिकांनी खोदली होती वानखेडेची खेळपट्टी
पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामन्यांच्या बाबतीत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेणे ही काही नवीन बाब नाही. आपली ताकद आणि राष्ट्रवादी भूमिका दाखवण्यासाठी पक्षाने अनेकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याला विरोध केला आहे. ऑक्टोबर १९९१ मध्ये पाकिस्ताविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्याला विरोध म्हणून शिवसैनिकांनी मुंबईतील वानखेडे मैदानावरील खेळपट्टी खोदून टाकली होती. इतकेच नव्हे, तर खेळपट्टीवर इंजिन ऑईलही ओतण्यात आले होते. शिवसेनेच्या या आक्रमकतेनंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील मालिका रद्द करण्यात आली होती.
दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानही खोदले
जानेवारी १९९९ मध्ये शिवसैनिकांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याला विरोध केला. त्यावेळी दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानावर (सध्याचे अरुण जेटली स्टेडियम) दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना खेळवला जाणार होता. मात्र, शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि फिरोजशहा कोटला मैदानावरील खेळपट्टी खोदून टाकली. १९९३ मध्ये झालेल्या मुंबईतील बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात असून, भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी शत्रू देशावर दबाब आणावा, अशी मागणी त्यावेळी शिवसेनेने केली होती. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हा सामना रद्द न करता, तो पुढे ढकलला आणि आठवडाभरानंतर दोन्ही संघांमध्ये चेन्नईच्या मैदानावर सामना पार पडला. शिवसैनिक शांत झाल्यानंतर दिल्लीमध्ये नव्या तयार केलेल्या खेळपट्टीवर दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय गोलंदाज अनिल कुंबळेने एका डावात १० बळी घेतले आणि इतिहास घडवला.
२०१५ मध्ये शिवसैनिकांचा बीसीसीआय मुख्यालयावर हल्ला
ऑक्टोबर २०१५ मध्ये बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष शशांक मनोहर आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरीयार खान यांच्यात एक बैठक होणार होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य द्विपक्षीय मालिकेवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेनेने तीव्र विरोध केला. यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात (वानखेडे स्टेडियम) घुसून तोडफोड केली आणि पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या. परिणामी ही नियोजित बैठक रद्द करण्यात आली होती. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही क्रिकेट मालिका झालेली नाही.
हेही वाचा : BJP-RSS Relations : भाजपाला आता पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हवाहवासा का वाटतोय? कारण काय?
जावेद मियांदादला मातोश्रीवर का बोलावलं होतं? भाजपाचा सवाल
रविवारी ठाकरे गटाने पुन्हा भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याला विरोध केल्याने भाजपानेही त्यांना प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानबरोबरच्या क्रिकेट सामन्यांना शिवसेनेचा जर इतकाच विरोध असेल, तर २००४ मध्ये ठाकरे कुटुंबाने पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू जावेद मियांदाद याला मातोश्रीवर का बोलावले होते, असा प्रश्न भाजपाकडून उपस्थित करण्यात आला. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य असूनही सामना होण्यावरून आवाज न उठवल्यामुळे ठाकरे गट त्यांचे नेते मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा मागणार का? असेही भाजपाचे नेते म्हणाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आशिया कप स्पर्धेतून माघार घेऊ शकत नाही. कारण- तसे केल्याने बीसीसीआयवर निर्बंध लादले जाऊ शकतात, असे भाजपाने स्पष्ट केले आहे.
भारतीय संघाने टाळलं पाकिस्तानी खेळाडूंबरोबर हस्तांदोलन
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच देशाच्या हिताला सर्वोच्च मानले आहे. त्यांनी दहशतवाद आणि सुरक्षेच्या समस्या अत्यंत कठोरतेने हाताळल्या आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली देश अधिकच मजबूत झाला आहे. मग आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर खेळल्या जाणाऱ्या खेळाला राजकारणात का ओढायचे?” असा प्रश्न राज्याचे महसूलमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने प्रचंड विरोध करूनही रविवारी भारत-पाकिस्तान यांच्यात दुबईच्या मैदानावर सामना खेळवण्यात आला. त्या सामन्यात भारताने सात गडी राखून पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. सामन्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंबरोबर हस्तांदोलन करणे टाळले. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडल्याने या प्रकरणाची संपूर्ण जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे.