Kalyan Banerjee Slams Trinamool congress आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय बलात्कर प्रकरण ताजे असतानाच कोलकातामध्ये पुन्हा एकदा विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाला. त्यावर राज्यातील सत्ताधारी असलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावर विरोधकांनी तृणमूल काँग्रेस पक्षाला धारेवर धरले. त्यानंतर कल्याण बॅनर्जी यांनी शनिवारी या प्रकरणावरून त्यांच्याच पक्षावर टीका केली आहे.
प्रकरण काय?
- “एखाद्या मित्राने मैत्रिणीवर बलात्कार केल्यास काय करू शकतो?,” असे विधान बॅनर्जी यांनी केले होते.
- कल्याण बॅनर्जी यांच्या विधानामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय वाद निर्माण केला.
- “विधी महाविद्यालयात घडलेल्या घटनेचे मी अजिबात समर्थन करीत नाही. आरोपींना अटक होऊन, शिक्षा झालीच पाहिजे. काही निवडक पुरुष अशा प्रकारचा गुन्हा करीत असतात. पण, जर मित्रच मैत्रिणीवर बलात्कार करीत असेल, तर काय करू शकतो? आता शाळांमध्येही पोलीस असतील का? या प्रकरणात एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याविरोधात गुन्हा केला. अशा वेळी पीडितेचे रक्षण कोण करणार?,” असे वक्तव्य त्यांनी केले होते.
बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेसची भूमिका
भारतीय जनता पक्षाने (भाजपा) त्यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली होती. भाजपाने बॅनर्जींवर आरोपींबद्दल सहानुभूती दाखवल्याचा आरोप केला होता. तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांनी पीडित महिलेलाच दोष दिला. त्यानंतर हे प्रकरण आणखी चिघळले. मात्र, तृणमूल काँग्रेसने आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवले. दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजमधील जघन्य गुन्ह्याबद्दल खासदार कल्याण बॅनर्जी आणि आमदार मदन मित्रा यांनी केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत होते, अशी तृणमूल काँग्रेसची भूमिका होती.
पक्ष त्यांच्या विधानांपासून स्पष्टपणे अलिप्त आहे आणि त्यांचा तीव्र निषेध करतो. हे विचार कोणत्याही प्रकारे पक्षाची भूमिका मांडत नाहीत. आमची भूमिका दृढ आहे. महिलांवरील घृणास्पद गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्वांना शक्य तितक्या कठोर शिक्षेची मागणी करतो, अशीही भूमिका तृणमूल काँग्रेसने सोशल मीडियावर मांडली.
कल्याण बॅनर्जी यांनी पक्षावर काय आरोप केले?
शनिवारी कल्याण बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या टीकेला उत्तर देताना पक्ष या गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, “मी तृणमूल काँग्रेसने ‘एक्स’वर केलेल्या पोस्टशी पूर्णपणे असहमत आहे. ते या गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहेत का? थेट जबाबदार असलेल्या नेत्यांवर त्वरित कारवाई केल्याशिवाय केवळ शैक्षणिक विधानांनी कोणताही बदल घडून आणणार नाही.”
ते म्हणाले, “दुर्दैवाची गोष्ट म्हणजे २०११ नंतर उदयास आलेल्या काही नेत्यांबाबत अशा गुन्ह्यांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. या गुन्हेगारांना प्रोत्साहन देणाऱ्या किंवा त्यांचे संरक्षण करणाऱ्यांपासून मी स्वतःला दूर ठेवू इच्छितो. माझ्या शब्द आणि विधानांमागील हेतू खरोखर समजून घेण्यासाठी, नैतिक आणि बौद्धिक संरेखनाची आवश्यकता आहे. दुर्दैवाने ती नसल्याचे दिसते,” असे ते म्हणाले. टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी एक्सवरील पक्षाचे विधान शेअर केले. त्यांनी महिलांविरुद्ध घृणास्पद टिप्पण्या कोणीही केल्या तरी त्यांचा निषेध करू, असे ते म्हणाले. दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर झालेल्या कथित बलात्कारानंतर त्यांनी हे विधान केले आहे.
कोलकाता बलात्कार प्रकरण
कोलकाता येथे कॉलेजमध्ये एका कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर कथित बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाने पुन्हा एकदा कोलकाता हादरले. दरम्यान या प्रकरणात तपास यंत्रणांच्या हाती मोठा पुरावा लागला असून या प्रकरणातील आरोपीच्या फोनमधून गुन्ह्याचा व्हिडीओ पोलिसांना सापडला आहे. या प्रकरणात मनोजित मिश्रा (३१) हा मुख्य आरोपी आहे. त्याला झैब अहमद (१९), प्रमित मुखोपाध्याय (२०) व पिनाकी बॅनर्जी (५५) या दोघांसह ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही विद्यार्थ्यांनी पीडितेला जबरदस्तीने गार्ड रूममध्ये नेले आणि तिला पळून जाण्यापासून रोखले. याच दरम्यान मिश्राने तिच्यावर बलात्कार केला असा आरोप आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.