karnataka high court on vote recounting : काही दिवसांपासून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे भाजपावर मतचोरीचा आरोप करीत आहेत. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने बंगळुरूच्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात १,००,२५० मतांची चोरी केली, असे राहुल यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यांच्या या दाव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या. यादरम्यान भाजपाच्या एका उमेदवाराने काँग्रेसवर मतचोरीचा आरोप करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मंगळवारी (१६ सप्टेंबर) या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने विधानसभा मतदारसंघाचा निकाल रद्द करून फेरमतमोजणीचे आदेश दिले आहेत.

काय आहे नेमकं फेरमतमोजणीचं प्रकरण?

दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्यातील मालूर विधानसभा मतदारसंघाचा २०२३ चा निवडणूक निकाल रद्द केला आहे. न्यायालयाने मतमोजणी प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेचा दाखला देत चार आठवड्यांच्या आत फेरमतमोजणीचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे काँग्रेसचे निवडून आलेले आमदार के. वाय. नंजेगौडा यांना मोठा धक्का बसला आहे. सुमारे दोन वर्षांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने याचिकाकर्ते भाजपाचे उमेदवार के. एस. मंजीनाथ गौडा यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी मतमोजणी प्रक्रियेचे व्हिडीओ सादर करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप आहे.

मालूर मतदारसंघात भाजपा-काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत

सध्या उच्च न्यायालयाने आपला निकाल पुढील ३० दिवसांसाठी स्थगित ठेवला असून, नंजेगौडा यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे. १९७८ मध्ये कर्नाटक राज्याची स्थापना झाल्यापासून मालूर मतदारसंघात सर्वाधिक चर्चेत राहिलेला आहे. या मतदारसंघात दर वेळी चुरशीच्या लढती होतात. काँग्रेसने आतापर्यंत चार वेळा हा मतदारसंघ जिंकला असून भाजपाने दोन वेळा, तर जनता दलाने (सेक्युलर) एकदा मतदारसंघात विजय मिळवला आहे. मालूर मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या कोलार लोकसभा मतदारसंघात येतो. हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक गड मानला जातो.

आणखी वाचा : Visual Storytelling : राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे भाजपात खळबळ? रायबरेलीत असं काय घडलं?

काँग्रेसच्या उमेदवाराने मिळवला होता विजय

२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने या मतदारसंघातून नंजेगौडा यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा सामना भाजपाचे उमेदवार मंजीनाथ गौडा यांच्याशी झाला. मंजीनाथ गौडा यांनी २०१३ मध्ये जनता दलाचे (सेक्युलर) उमेदवार म्हणून मालूर मतदारसंघात विजय मिळवला होता. मालूर मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेसमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली होती. काँग्रेसचे उमेदवार नंजेगौडा यांना २९.४%, तर भाजपाचे मंजुनाथ यांना २९.२६% मते मिळाली. मात्र, अपक्ष उमेदवार हूडी विजयकुमार यांनी तब्बल २८.४८ टक्के मते मिळवून लढतीचे चित्र बदलून टाकले. त्यामुळे या निवडणुकीत नंजेगौडा यांनी २४८ मतांनी विजय मिळवला; तर मंजुनाथ यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष बाब म्हणजे अपक्ष उमेदवार विजयकुमार हेदेखील विजयापासून अवघ्या १,६०० मतांनी मागे होते.

भाजपाच्या उमेदवाराने घेतली उच्च न्यायालयात धाव

दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच भाजपा उमेदवार मंजुनाथ यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. “मतमोजणी अधिकाऱ्यांनी मला फोन करून विजयी झाल्याचे सांगितले होते; पण नंतर काँग्रेस उमेदवाराचा विजय घोषित करण्यात आला. त्यामुळे मी न्यायालयात दाद मागितली. या निवडणुकीत काँग्रेसने मतचोरी केली आहे,” असे मंजुनाथ यांनी याचिकेत म्हटले होते. मंगळवारी उच्च न्यायालयाने दिलेल्या फेरमतमोजणीचा आदेश दिल्यामुळे काँग्रेसचे आमदार नंजेगौडा यांचा विजय धोक्यात आला आहे. काँग्रेसमधील सूत्रांच्या मते, नंजेगौडा कर्नाटक मिल्क फेडरेशनचे (नंदिनी ब्रँड) अध्यक्ष होण्याच्या प्रयत्नात होते; पण फेरमतमोजणीचा निकाल भाजपाच्या बाजूने लागल्यास त्यांचे विधानसभा सदस्यत्व धोक्यात येऊ शकते.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींबद्दल प्रणिती शिंदे यांनी काय विधान केलं? भाजपाचे नेते कशामुळे संतापले?

भाजपाविरुद्ध काँग्रेसकडून मतचोरीचा आरोप

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सातत्याने भाजपा आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप करीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत भाजपाने निवडणूक आयोगाशी संगनमत करून कशी मतचोरी केली याचे काही पुरावे दाखवले होते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही ४० लाखांहून अधिक मते ही संशयाच्या घेऱ्यात आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. निवडणूक आयोग या याद्यांवर गप्प का? असे म्हणत त्यांनी ढीगभर पुरावे आणि मतदार याद्याच दाखवीत सादरीकरण केले होते. त्यांच्या या आरोपांचे भाजपासह निवडणूक आयोगाने खंडन केले होते. उलटपक्षी काँग्रेसने अनेकदा निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप भाजपाच्या नेत्यांनी केला आहे.

भाजपाचा पराभूत उमेदवार पुन्हा विजयी होणार?

दरम्यान, कथित मतचोरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना न्यायालयाने याच मुद्द्याशी संबंधित एका प्रकरणाचा निकाल भाजपाच्या बाजूने दिला आहे, त्यामुळे भाजपा आणि काँग्रेसमध्ये मत चोरीच्या आरोपावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने मालूर मतदारसंघातील फेरमतमोजणीचा आदेश दिल्यानंतर भाजपाचा पराभूत उमेदवार पुन्हा विजयी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर कर्नाटकमधील भाजपाचे विरोधीपक्षनेते आर. अशोक यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपावर मतचोरीचा आरोप करणारे राहुल गांधी आता नंजेगौडांविरुद्ध ‘मत चोरी यात्रा’ काढणार आहेत का? असा टोला त्यांनी लगावला आहे. काँग्रेसने मात्र या निकालावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.