मुजफ्फर खान
चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम ९३.१८ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करत महामार्गावरील प्रश्न झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील एकमेव आमदार शेखर निकम यांनी महामार्गाच्या दर्जाहीन कामाबाबत पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून पालकमंत्र्यांचा दावा फोल ठरविला.
सध्या महायुती सरकारमधील दोन लोकप्रतिनिधींची परस्पर विधाने चर्चेचा विषय ठरली असून या सत्ताधारी पक्षातील नेत्यांमधील वाद आता अधिवेशना पर्यंत पोहचला आहे. पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार शेखर निकम यांच्यातील संबंध खरंच ताणले गेले आहेत का, असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील सोळा वर्षापासून रखडलेले आहे. या महामार्गावर हजारो अपघात होऊन आतापर्यंत लाखोंचे बळी गेले आहे. अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. महामार्गाचे काम सध्या पूर्ण होत आले असले तरी रस्त्याला तडे जाणे, संरक्षक भिंती कोसळणे, भराव टाकून तयार केलेला रस्ता खचणे, उड्डाणपूल खचणे अशा नव्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकतेच या महामार्गाची पाहणी करून हे काम लवकरात लवकर पूर्ण कसे होईल यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. संगमेश्वर मध्ये महामार्गाच्या कामातील अडथळ्यांवर पर्याय सुचवले होते. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना त्यांनी या महामार्गाचे काम ९३.१८ टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला. आरवली ते काटे दरम्यान केवळ साडेचार किलोमीटरचे काम शिल्लक आहे, तेही डिसेंबर अखेर पूर्ण होईल, असे सामंत यांनी सांगितलं. मात्र वस्तुस्थिती झाकण्याचा प्रयत्न पालकमंत्री सामंत यांनी केल्याचे आमदार शेखर निकम यांनी उघड केले आहे.
गणेशभक्तांच्या वाटेत यंदाही विघ्न
यावर्षी गणेशोत्सवासाठी महामार्गाने येणाऱ्या भक्तांना अनंत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. परंतु चाकरमान्यांचा खड्ड्यातील प्रवास यावर्षी शेवटचा असेल असा शब्द पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला. पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी महामार्गाच्या विषयावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करू नये म्हणून पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवस अगोदरच महामार्गाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.
मात्र अधिवेशन सुरू झाल्यानंतर सरकारमधील आमदार शेखर निकम यांनी मुंबई गोवा महामार्गावरून लक्षवेधी मांडत नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वतः गाडीतून फिरून महामार्गावरील ब्लॅक स्पॉट पाहिले. पण आमचा संपूर्ण महामार्गच ‘एक ब्लॅक स्पॉट’ आहे. असे सांगून महामार्गाबद्दल असलेली नाराजी सभागृहात जाहीरपणे व्यक्त केली. इतकंच नाही तर यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत आमदारांची बैठक घ्यावी, अशी मागणीही निकम यांनी केली.
यावर उत्तर देताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सकारात्मकता दर्शवत, या मुद्द्यावर सर्व आमदारांसोबत एकत्र बैठक घेतली जाईल याचे पत्र गडकरी यांनाही दिले जाईल असे सांगितले आहे. आमदार यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामांबाबत लोकांची अस्वस्थता, जीवितधोके आणि वाहतुकीतील अडथळे यांवर अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून पालकमंत्र्यांनी झाकलेले विषय पुन्हा उघडण्याचा प्रयत्न आमदार शेखर निकम यांनी केला आहे. यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांची पंचाईत होवून या दोन सत्ताधारी पक्षातील नेत्यां मधील वाद समोर आले आहेत. आधीच प्रशांत यादव यांच्या शिवसेना प्रवेशामुळे या दोन नेत्यांमधील वाद समोर आले असताना आता आमदार शेखर निकम यांनी पालकमंत्र्यांना कोंडीत पकडून त्यांचा खोटेपणा उघड केल्याची चर्चा रत्नागिरी जिल्ह्यात रंगू लागली आहे.
इथून वादाला सुरुवात
राजापूर मध्ये सामंत कुटुंबीयांवर जहरी टीका करणारे अजित यशवंतराव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेताना आमदार शेखर निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ती पालकमंत्र्यांना जिव्हारी लागली. त्यामुळे राजापूरचे आमदार किरण सामंत आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी शेखर निकमचे राजकीय विरोधक आणि शरद पवार गटाचे नेते प्रशांत यादव यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निकम आणि सामंत यांच्यामध्ये राजकीय शीतयुद्धाला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्यानंतर आपले प्रश्न सुटतात असा विश्वास आमदार निकम यांना असल्यामुळे त्यांनी पालकमंत्र्यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न केला आहे.
पालकमंत्री राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याबद्दल दुमत नाही. पण अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडून सरकारचे लक्ष वेधून घेणे गरजेचे होते. मी हा प्रश्न मांडल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर बैठक झाली तर राहिलेले प्रश्न लवकर मार्गी लागतील. – शेखर निकम, आमदार, चिपळूण
आमदार शेखर निकम यांनी चिपळूण शहरातील नाल्यावरील अतिक्रमण, महामार्ग रुंदीकरणामुळे विस्थापित होणारी चिपळूण शहराची पाणी पुरवठा योजना,भूमिगत वीज वाहिन्या व सीएनजी गॅस पाईपलाईन कामाच्या चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या कामांची चौकशी लावावी. ही कामे चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे भविष्यात कुणाचा तरी बळी नक्की जाईल.- नित्यानंद भागवत, विभाग प्रमुख शिवसेना चिपळूण