Lalu Prasad Yadav Dalit Voters : १९६९ साली बिहारच्या पाटणा विद्यापीठात शिक्षण घेत असताना लालू प्रसाद यादव यांनी पहिल्यांदाच एका राजकीय आंदोलनात सहभाग घेतला. त्यावेळी शंकराचार्य यांनी दलितांबद्दल केलेल्या कथित अपमानकारक वक्तव्याविरोधात समाजवादी पार्टीचे नेते शिवानंद तिवारी यांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं. याच आंदोलनातून लालूंचा राजकीय उदय झाला आणि त्यांनी दलितांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवायला सुरुवात केली. या घटनेला साडेपाच दशकांहून अधिक कालावधी लोटला असून लालूंनी बिहारमध्ये आपलं राजकीय साम्राज्य निर्माण केलं आहे. आता ते एका नवीन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
११ जून २०२५ रोजी राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. यावेळी लालूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांचं दर्शन घेतलं. यादरम्यान, त्यांच्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आणि बिहारमध्ये एक नवीन वादंग निर्माण झाला. लालूंनी डॉ. आंबेडकरांची प्रतिमा जमिनीवर ठेवून तिची पूजा केल्याचा राज्यातील भाजपा नेत्यांनी केला आहे. त्यांच्या या कृतीने महापुरुषाचा अवमान झाल्याचं भाजपाच्या नेत्यांचं म्हणणं आहे.
लालू प्रसाद यादव यांची राजकीय कारकीर्द
- लालू प्रसाद यादव हे बिहारच्या राजकारणात जवळपास सहा दशकांपासून सक्रिय आहेत.
- त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत इतर मागासवर्गीय समुदायासाठी काम केले.
- १९९० मध्ये लालू प्रसाद यादव हे बिहारमधील समाजवादी नेते म्हणून उदयास आले.
- १९९० ते १९९५ यादरम्यान त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कार्यकाळात लालूंनी गरिबांच्या हितासाठी आवाज उठवला.
- लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात दलितांच्या प्रश्नांपासून केली.
- दलितांच्या प्रश्नावर आवाज उठविल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मोठी प्रगती झाली.
- बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाची एक मजबूत मतपेढी (व्होट बँक) आहे.
- लालूंचा पक्ष सध्या सत्तेत नसला तरीही त्यांची राज्यात मोठी ताकद आहे,” असे शिवानंद तिवारी यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेसला’ सांगितले.
- भाजपाचं आंबेडकरप्रेम हे अलीकडचं असून पूर्णपणे राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत तिवारी यांनी भाजपा नेत्यांना लक्ष्य केलं आहे.
आणखी वाचा : सोनिया गांधी यांच्या इराणवरील ‘त्या’ लेखामुळे वादंग का उठला? भाजपाचे नेते कशामुळे आक्रमक झाले?
चारा घोटाळ्यामुळे लालूंच्या कारकीर्दीला कलाटणी
बिहारमधील १९९५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर लालू प्रसाद यादव यांनी राज्याच्या राजकारणात आपली छाप सोडली. त्यांनी मुस्लीम–यादव मतदारसंघ तयार करण्यास सुरुवात केली. परंतु, चारा घोटाळ्यात त्यांचे नाव आल्यामुळे लालूंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी मुख्यमंत्री झाल्या. त्यानंतर बिहारच्या राजकारणात राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्ष अधिकाधिक मुस्लीम–यादव मतदारांचा पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र, असं असलं तरीही आरजेडीमध्ये सध्याचे माजी खासदार रघुवंश प्रसाद सिंह, जगदानंद सिंह (ज्यांनी नुकतेच आरजेडीचे प्रदेशाध्यक्षपद सोडले) आणि प्रभुनाथ सिंह यांच्यासारखे दिग्गज नेते होते.
२००० नंतर लालूंच्या रणनितीत बदल
२००० च्या विधानसभा निवडणुकांपर्यंत लालूंच्या पक्षाने – मंडलीकरण, धर्मनिरपेक्षीकरण आणि यादवीकरण, अशा त्रिस्तरीय बदलाची प्रक्रिया पूर्ण केली होती. आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी राज्यातील १९.६५% दलित मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठीही प्रयत्न केले. यासाठी त्यांनी २००० साली पक्षात सामील झालेले मुजफ्फरपूरचे दलित नेते रमाई राम यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. मात्र, राजकीय विश्लेषक संजय कुमार यांच्या मते, राम यांची निवड फक्त एक दिखावा होता. कारण- २००० नंतरही आरजेडीचा मुख्य मतदार समूह मुस्लीम आणि यादवच असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे पक्षाने या दोन समुदायांमधूनच सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.
दलित मतदार आरजेडीपासून दूर का गेले?
यादरम्यान, लालूंना दलित मतदारांना एकत्र आणणं कठीण गेलं. त्यामागचं कारण म्हणजे, त्या काळात लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक राम विलास पासवान यांनी पासवान समुदायावर आपली पकड निर्माण केली होती, तर रविदास समुदाय काँग्रेसच्या बाजूने ठामपणे उभा राहिला होता, जो आजही आहे. सध्या राष्ट्रीय जनता दल पक्षाची धुरा लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे सांभाळत आहेत. २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून त्यांनी समावेशी राजकारणाला प्राधान्य देऊन दलित मतांसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आरजेडीमध्ये एकही दलित चेहरा नाही?
आरजेडीतील दलित समाजातील प्रमुख नेत्यांनी पक्ष सोडला आहे. तर काही दिग्गज नेते सक्रिय राजकारणातून दूर गेले आहेत. बिहारचे माजी विधानसभा अध्यक्ष व लालूंच्या पक्षातील दलित नेते उदय नारायण चौधरी हे सध्या राजकारणात फारसे सक्रिय नाहीत, तर माजी मंत्री श्याम रंजक यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आरजेडीला सोडचिठ्ठी दिली आहे. सध्या बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचे एकूण ७६ आमदार असून त्यापैकी फक्त सहा आमदार अनुसूचित जाती (दलित) समुदायातून आहेत.
व्हायरल व्हिडिओमुळे लालू प्रसाद यादव अडचणीत
दरम्यान, लालू प्रसाद यादव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कथित अपमान केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंत बिहारमधील सत्ताधारी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आरजेडी प्रमुखांवर टीकेची तोफ डागली आहे. दुसरीकडे, राज्यातील अनुसूचित जाती आयोगाने १३ जून रोजी लालूंना नोटीस बजावली आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही लालूंवर टीका केली. त्यानंतर १९ जून रोजी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने माजी मुख्यमंत्री लालू यादव यांना नोटीस पाठवली आहे.
हेही वाचा : Police Bharti Cancel : विधानसभा निवडणुकीआधी जाहीर केलेली पोलीस भरती रद्द; भाजपाने असा निर्णय का घेतला?
पंतप्रधान मोदींची लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सिवान येथील सभेतून लालू प्रसाद यादव यांना लक्ष्य केलं. ते म्हणाले, “राष्ट्रीय जनता दल हा पक्ष कधीही दलित आणि मागासवर्गीय समुदायाचा आदर करीत नाही. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आणि या चुकीवर ते कधीही माफी मागणार नाही हे मला माहिती आहे. कारण- त्यांच्या मनात दलित आणि मागासवर्गीयांसाठी कोणताही आदर नाही. आरजेडी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी डॉ. बाबासाहेबांचा फोटो त्यांच्या पायाशी ठेवला, पण मोदी हे महापुरुषाला आपल्या हृदयात ठेवतात… बिहारची जनता हा अपमान कधीच विसरणार नाही.”
भाजपाच्या टीकेला आरजेडीकडून जशास तसं उत्तर
बिहारमधील या राजकीय वादंगानंतर राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज कुमार झा म्हणाले, “पंतप्रधान मोदी हे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर टीका करताना विसरले की, गेल्या डिसेंबरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अतिशय अशोभनीय टिप्पणी केली होती. त्यांनी केलेल्या या अपमानजनक विधानामुळे बाबासाहेबांचा अपमान झाला नाही का? त्यावेळी पंतप्रधानांनी बाळगलेल्या मौनातूनच त्यांचा महापुरुषांविषयीचा आदर दिसून येतो.” दरम्यान, बिहारमध्ये यावर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे याच मुद्द्याला हाताशी धरून सत्ताधारी पक्षांकडून लालू प्रसाद यादव यांना लक्ष्य केलं जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना उत्तर देण्यासाठी आरजेडीचे नेते नेमकी काय रणनीती आखणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.