कोल्हापूर : महादेवी हत्ती नांदणीला परत आणण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यातही आगामी निवडणुकीत ज्यांना राजकीय झळ पोचू शकते त्यांचीच अधिक धावपळ सुरू आहे. यामुळे अशा पक्षांच्या नेत्यांच्या हालचालीची राजकीय अंगाने चर्चा होत आहे.

नांदणी जैन मठातील महादेवी तथा माधुरी हत्ती उद्योगपती अंबानी यांच्या वनतारा पशुसंग्रहालयाकडे पाठवण्यात आला आहे. या वरून एकीकडे वनतारा, अंबानी उद्योग समूह, त्यांची उत्पादने यांच्या विरोधात जनभावना तप्त होऊ लागल्या आहेत. विषयाची व्याप्ती मोठी असल्याने त्याचे राजकीय परिणाम होण्याची शक्यताही दिसू लागली आहे. याची झळ बसू शकते याची जाणीव होऊ लागल्याने संबंधित नेत्यांची धावपळ अधिकच वाढली आहे.

नांदणी हे शिरोळ तालुक्यातील गाव. याच तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे मोहोळ सर्वाधिक आहे. या तालुक्यात जैन धर्मियांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आणि राजकीय दृष्ट्या निर्णायक ठरू शकणारी आहे. नांदणी जैन मठाचा हत्ती परत यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी सुरुवातीपासूनच आक्रमक राहिले. नांदणी ते कोल्हापूर अशी ५५ किलोमीटरची आत्मक्लेष यात्रा त्यांनी काढली. त्याला मिळालेला प्रतिसाद हा शेट्टी यांच्या राजकीय पुनर्वसनाला मदत करण्यास सहाय्यभूत ठरू शकतो.

ही बाब लक्षात घेवून त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी खासदार धैर्यशील माने यांनीही माधुरी हत्ती परत मिळावा यासाठी प्रयत्न चालू ठेवले. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन हत्ती परत येण्यासंदर्भात प्रयत्न केले.

धार्मिक हत्ती प्रकरणातील जैन समाजातील एकूण संतप्त भावना लक्षात घेऊन शिरोळचे राजेंद्र पाटील यड्रावकर व इचलकरंजीचे राहुल आवाडे या जैन धर्मीय आमदारांसह हातकणंगलेचे जनसुराज्य पक्षाचे आमदार अशोक माने यांनाही यासाठी प्रयत्न करणे भाग पडले. राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय उपस्थित करून संयुक्त बैठक घेण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांचे फलित म्हणून वनताराचे उपकेंद्र नांदणी येथे सुरू होऊन तेथे महादेवी हत्ती परत येण्याची येण्याच्या दृष्टीने पावले पडू लागली आहेत.

काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनीही हा विषय तापता ठेवत आपले सक्रिय प्रयत्न दाखवून दिले. राज्य शासनाची निष्क्रियता, अंबानी उद्योग समूहाला सहकार्याची भूमिका या मुद्द्यांवरून त्यांनी तोफ दागत आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनीही दिल्ली दरबारी याविषयी आवाज उठवला. त्यांचे पुत्र कृष्णराज या निमित्ताने सक्रिय झाले आहेत.

तुलनेने प्रकाश आबिटकर व हसन मुश्रीफ हे जिल्ह्यातील दोन्ही आजी-माजी पालकमंत्री या प्रकरणात निमित्त मात्र दिसले. मंत्री चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्र्यांकडील बैठकीपुरते दिसले. जिल्ह्यातील इतर नेत्यांना या प्रकरणाचे काहीच सोयर सुतक नसल्यासारखे होते. ज्यांना महादेवी हत्ती, नांदणी मठ, जैन मतदार तीव्रतेने फटका बसू शकतो असेच नेते या प्रकरणात सक्रिय असल्याचे पुनःपुन्हा दिसून येत आहे.