काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना अजित पवार यांनी, २०१९ च्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात बैठक झाली होती आणि त्या बैठकीला शरद पवार, तसेच उद्योगपती गौतम अदाणीसुद्धा उपस्थित होते, असा दावा केला होता. मात्र, त्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या विधानावरून यू टर्न घेत या बैठकीत गौतम अदाणी नव्हते, असं स्पष्टीकरण दिलं. अजित पवारांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं तर ही पहिली अशी वेळ नाही, जेव्हा राजकीय वर्तुळात या बैठकीचा उल्लेख झाला. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अशा प्रकारची बैठक झाल्याचा दावा केला होता. तसेच शरद पवार यांनी या संदर्भात भाष्य केलं होतं. मात्र, आता अदाणींचं नाव पहिल्यांदाच पुढे आल्यानंतर या बैठकीची चर्चा पुन्हा केंद्रस्थानी आली आहे. दरम्यान, या संदर्भात कुणी काय दावे केले ते जाणून घेऊ…

हेही वाचा – वाशीममध्ये भाजप व शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजीचे आव्हान, दलितांमध्ये रोषाची भावना; जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर?

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

अजित पवार यांनी नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांना २०१९ चा शपथविधी आणि त्यानंतर आता शरद पवार यांची साथ का सोडली, असा प्रश्न विचारण्यात आला. या संदर्भात बोलताना, “मी शरद पवारांना सोडलं नाही. मी फक्त त्यांनी दिलेल्या आदेशांचं पालन करीत होतो. अनेकांनी माहीत आहे, की त्यावेळी भाजपाबरोबर सत्ता स्थापन करण्यासाठी बैठक झाली होती. त्या बैठकीला मी, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अमित शाह, आणि गौतम अदाणी उपस्थित होते”, असं अजित पवार म्हणाले.

जेव्हा या विधानानंतर विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी या विधानावरून यू टर्न घेत, त्या बैठकीत गौतम अदाणी नव्हते, असं स्पष्टीकरण दिलं. “असं काही झालेलं नव्हतं. गौतमी अदाणी तिथे नव्हते. खरं तर या संदर्भात अनेक बैठका झाल्या होत्या. त्यापैकी एक बैठक गौतम अदाणी यांच्या गेस्ट हाऊसमध्येही झाली होती. त्यामुळे माझ्या तोंडून चुकून त्यांचं नाव निघालं असेल”, असं ते म्हणाले.

हेही वाचा – चिपळूण, राजापूरमध्ये वडिलांसाठी लेकी प्रचाराच्या मैदानात

देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय म्हटलं होतं?

‘द हिंदू’ला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना, देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रकारे बैठक झाल्याचा दावा तर केला. मात्र, या बैठकीत गौतम अदाणी होते, हा अजित पवारांचा दावा त्यांनी फेटाळला. “अजित पवार म्हणत आहेत, ते खरं आहे. दिल्लीत अशा प्रकारची बैठक झाली होती. मात्र, त्या बैठकीत गौतम अदाणी नव्हते. त्यावेळी मी, अजित पवार, शरद पवार, अमित शाह व प्रफुल्ल पटेल उपस्थित होतो. ही बैठक शरद पवार यांनीच बोलावली होती. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे पत्रही शरद पवार यांनी दिले होते”, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला होता.

बैठकीच्या चर्चांवर शरद पवारांची भूमिका काय?

शरद पवार यांनी लोकसत्ताच्या एका कार्यक्रमात बोलताना, या संदर्भात वक्तव्य केलं होतं. “हे खरं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाबरोबर युती करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, मी त्यांना हे शक्य नाही, असं सांगितलं होतं” असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शरद पवार यांच्या दाव्याला दुजोरा दिला होता. “पंतप्रधान मोदींकडून असा प्रस्ताव आला होता. त्याबाबत पक्षाच्या बैठकीत चर्चाही झाली होती. मात्र, सर्वांनी ही युती करण्यास नकार दिला होता”, असं नवाब मलिक म्हणाले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2019 meeting that wont end ajit pawar devendra fadnavis sharad pawar spb