Maha Vikas Aghadi in Raigad : रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षात असलेला समन्वयाचा आभाव उघड झाला आहे. त्यामुळे सात पैकी चार विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार समोरासमोर असणार आहे. महाविकास आघाडीतील हे मत विभाजन महायुतीच्या पथ्यावर पडू शकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यात जागा वाटपापासून सुरू झालेला महाविकास आघाडीतील तिढा उमेदवारी अर्ज घेण्याची मुदत संपली तरी सुटू शकला नाही. शेकाप आणि शिवसेनेतील सुप्त संघर्ष यास कारणीभूत ठरला आहे. महा विकास आघाडीचे जागा वाटप होण्यापुर्वी शिवसेना ठाकरे गटाने आधी उरण, कर्जत आणि महाड मतदारसंघातून आपले उमेदवार जाहीर केले. नंतर शेतकरी कामगार पक्षाने अलिबाग, पेण, उरण आणि पनवेल या चार मतदारसंघातून परस्पर आपले उमेदवार जाहीर केले. श्रीवर्धन मधूनही राष्ट्रवादी शरद पवार गटाने शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांना परस्पर पक्षात घेत उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पक्षातून अनिल नवगणेंची हकालपट्टी करण्याची वेळ ठाकरे गटावर आली. याच मतदारसंघातून काँग्रेसच्या राजेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाविरोधात अपक्ष म्हणून उमेदवार दाखल केला. त्यामुळे महा विकास आघाडीतील घटक पक्षांमधील समन्वयाचा आभाव प्रकर्षाने समोर आला.

हेही वाचा :Rebellion in Vidarbha: विदर्भातील १८ मतदार संघांत बंडखोरी! युती, आघाडीची कसोटी

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिवसेना उध्दव ठाकरे गटाने अलिबाग, पेण आणि पनवेलची मधील आपले उमेदवार मागे घेण्याची घोषणा केली मात्र अलिबागचा अपवाद सोडला तर पेण आणि पनवेल मधून त्यांनी आपले उमेदवार कायम ठेवले. उरण मधून शेकापच्या प्रितम म्हात्रे यांनी आपला अर्ज मागे घेण्यास नकार दिल्याने शिवसेना ठाकरे गटाने पेण आणि पनवेल मध्ये शेकाप विरोधात आपले उमेदवार कायम ठेवले असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे उरण, पनवेल, पेण, श्रीवर्धन या चार मतदारसंघात महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे उमेदवार निवडणुक रिंगणात असणार आहेत. यातील तीन मतदारसंघात शेकाप आणि शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार निवडणूक लढणार आहेत. घटक पक्षात असलेल्या समन्वयाचा आभाव आणि एकमेकांबद्दल असलेला अविश्वास यामुळे आघाडीत बिघाडी कायम राहिली आहे. चारही मतदारसंघात महाविकास आघाडीचे मतविभाजन महायुतीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :शिवसेना, धनुष्यबाण ही शिवसेनाप्रमुखांची मालमत्ता; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती

अलिबागची जागा ठाकरे गटाने सोडली….

पनवेल, पेण, उरण मधे शेकाप विरोधात शिवसेना ठाकरे गटाने आपले उमेदवार कायम ठेवले असले तरी, अलिबाग मधून शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार मागे घेतला आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मतदारसंघातून जयंत पाटील यांची सून चित्रलेखा पाटील निवडणूक लढवत आहे. सुरेंद्र म्हात्रे यांनी माघार घेतल्याने मतदारसंघात महा विकास आघाडीच्या मतांचे विभाजन टळू शकणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 mahavikas aghadi candidates face off in four constituencies in raigad district print politics news css