BJP answer in Maharashtra to INDIA Alliance ‘vote chori’ Claims : राज्यात आगामी काळात मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी विरोधकांनी मतदार यादीतील कथित घोळाबाबत आरोपांची राळ उठवली आहे. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपा आपली ‘व्होट जिहाद’ मोहीम अधिक आक्रमकपणे राबवणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी हरियाणात घेतलेल्या ‘H-फाइल्स’ पत्रकार परिषदेमुळे या मोहिमेला आणखी बळ मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाजपाची नवीन मोहीम कशी असेल? त्याविषयीचा हा आढावा…

भाजपाच्या नेत्याने काय सांगितले?

“गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही विरोधकांच्या (इंडिया आघाडी) संविधानविरोधी कथनाला हलक्यात घेतले. परिणामी आम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली. तो अनुभव आमच्यासाठी डोळे उघडणारा ठरला. आता विरोधकांच्या अपप्रचाराला आम्ही ठामपणे उत्तर देणार असून, ‘व्होट जिहाद’ हीच आमची प्रमुख रणनीती असेल,” असे भाजपाच्या एका निवडणूक व्यवस्थापकाने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला राज्यातील ४८ पैकी केवळ नऊच जागांवर यश मिळाले होते. विशेष बाब म्हणजे २०१९ मध्ये त्यांनी २३ जागा जिंकल्या होत्या.

‘व्होट जिहाद’ मोहिमेची रणनीती

‘व्होट जिहाद’ मोहिमेला बळ देण्यासाठी भाजपाकडून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये तालुका पातळीवर कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या मोहिमेत कॅबिनेट मंत्री तथा मुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष आशीष शेलार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. शेलार यांनी बुधवारी दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत विरोधकांवर थेट हल्लाबोल केला. “महाविकास आघाडी आणि मनसेचे नेते फक्त मराठी माणूस किंवा हिंदूंशी संबंधित दुबार मतांबद्दल का बोलत आहेत? मुस्लिमांबद्दल ते का शांत आहेत,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा : Top Political News : अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी; महायुतीत साड्या वाटपावरून वाद, जरांगेंचे मुंडेंवरील आरोप; वाचा ५ घडामोडी…

मुस्लिमांनी दुबार मतदान केल्याचा आरोप

कर्जत-जामखेड, मुंब्रा, कालरा, मालाड पश्चिम व धारावी या मतदारसंघांमध्ये मुस्लिमांनी ‘दुबार मतदान’ केल्याचा आरोपही शेलार यांनी केला. राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये किमान १०.६ लाख दुबार मुस्लीम मतदार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही दुबार मतदारांच्या आरोपावरून विरोधकांना लक्ष्य केले. “मतचोरीचे आरोप झाल्यानंतर मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्याची मागणी करणारा भाजपा पहिला राजकीय पक्ष होता. एकीकडे विरोधक मतचोरीचा आरोप करतात आणि दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरात सुरू केलेल्या मतदारांच्या विशेष फेरतपासणी मोहिमेला विरोध करतात”, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.

भाजपाची जशास तसे भूमिका

अलीकडेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढून सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. या मोर्चात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही सहभाग होता. यावेळी विरोधकांनी राज्य निवडणूक आयोग आणि भाजपामध्ये साटेलोटे असल्याचा आरोपही केला. त्यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठीच भाजपाने आपली ‘व्होट जिहाद’ मोहीम अधिकच तीव्र करण्याचा निर्णय घेतला, असे पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. दरम्यान, भाजपाच्या या मोहिमेवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसचा भाजपावरील आरोप काय?

“भाजपा पुन्हा ‘व्होट जिहाद’सारख्या आरोपांकडे वळत आहे. लोकांमध्ये द्वेष पसरवूनच हा पक्ष राजकारण करण्याचा प्रयत्न करतो हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे”, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. “भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लीम आणि दलितविरोधी आहे. त्यांचे संपूर्ण राजकारण समाजात संघर्ष निर्माण करून विभागणी करण्यावर आधारित आहे,” अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

‘व्होट जिहाद’ म्हणजे काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘व्होट जिहाद’ हा शब्द चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. २०२१-२२ मध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांसारख्या उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी हिंदू मतदारांना एकत्र आणण्यासाठी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात मोहीम सुरू केली होती. गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं, तो सेफ हैं’, असा नारा दिला होता; तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’. असा इशारा दिला होता. तरीदेखील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता.

हेही वाचा : Maharashtra Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणाची कसोटी? राजकीय पक्षांसाठी काय पणाला?

फडणवीसांकडून व्होट जिहादचा थेट आरोप

भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपयशामागचे कारण ‘व्होट जिहाद’ असल्याचे म्हटले होते. “निवडणुकीत भाजपाच्या मताधिक्यात घट झाली नाही, तरीही पक्षाला काही जागा गमवाव्या लागल्या. एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी हिंदूंच्या विरोधात एकत्र मतदान केले. आम्हाला जवळपास १४ मतदारसंघांत याची प्रचीती आली”, असे फडणवीस म्हणाले होते. यावेळी धुळे लोकसभा मतदारसंघाचे उदाहरण देताना फडणवीसांनी मालेगाव या मुस्लीमबहुल भागाचा उल्लेख केला होता. “या मतदारसंघातील पाचही विधानसभा विभागांमध्ये भाजपाच्या उमेदवाराने आघाडी घेतली होती; पण मालेगावमधील मुस्लीम मतदारांनी १०० टक्के विरोधात मतदान केल्याने शेवटच्या क्षणी आमच्या उमेदवाराचा पराभव झाला”, असेही ते म्हणाले होते.

दुबार मतदारांना हमीपत्र बंधकारक

दरम्यान, मतचोरी आणि मतदारांच्या दुबार नावांवरून विरोधकांनी आरोपांची राळ उठवली असताना राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एक यंत्रणा तयार केल्याचे सांगितले. मतदार यादीतील दुबार मतदारांची नावे ओळखून, त्या नावांपुढे दुबार मतदार, अशी नोंद करण्यात येईल. तसेच दुबार मतदार मतदानासाठी आल्यास अन्य कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याचे हमीपत्र त्याच्याकडून घेण्यात येईल, असे निवडणूक दिनेश वाघमारे सांगितले. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी निवडणूक होईल आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा निकाल जाहीर होणार आहे.