नंदुरबार – विधानसभा निवडणुकीत संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे पानिपत होत असताना नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर मतदारसंघातून विजय मिळवत काँग्रेसचे शिरीष नाईक यांनी आघाडीला भोपळा मिळण्यापासून वाचविले. उत्तर महाराष्ट्रातील ३५ पैकी महाविकास आघाडीला केवळ एकाच जागेवर विजय मिळविता आल्याने नाईक हे चर्चेत आले आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे या तीनही जिल्ह्यात महाविकास आघाडीची पाटी कोरी राहिली. महायुतीने दणदणीत यश मिळविले. महायुतीला केवळ दोन जागा जिंकता आल्या नाहीत. त्यापैकी एक मालेगाव मध्य मतदारसंघाची तर, दुसरी नवापूरची. मालेगाव मध्य मतदारसंघाची जागा एमआयएमचे मौलाना मुफ्ती यांनी तर, नवापूरची जागा काँग्रेसने कायम राखली. नवापूरची लढत शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीची झाली. मतमोजणीच्या शेवटच्या काही फेऱ्यापर्यंत अपक्ष उमेदवार शरद गावित आघाडीवर होते. २३ व्या फेरीत त्यांची आघाडी १९७ मतांची होती. परंतु, २४ व्या फेरीत नाईक यांनी ५२५ मतांची आघाडी घेतली. त्यातच टपाली मतांचा समावेश करण्यात आल्याने ही आघाडी एक हजार १२१ मतांपर्यंत पोहचली. आणि नाईक यांचा निसटता विजय झाला. नाईक यांच्या विजयात शरद गावित यांचे नामसाधर्म्य असलेल्या दुसऱ्या एका अपक्षाचाही वाटा राहिला. या अपक्षाला एक हजार १४ मते मिळाली. नाईक यांनी विजय मिळविलेले शरद गावित हे भाजपचे डाॅ. विजयकुमार गावित यांचे लहान बंधू आहेत. २००९ मध्ये ते नवापूर मतदारसंघातून अपक्ष म्हणूनच विजयी झाले होते. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत ते अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविली आहे.

हेही वाचा – गोंदिया जिल्ह्यात महायुतीचेच वर्चस्व; लाडक्या बहिणींची कमाल, तीन जागी भाजप, एका जागेवर अजित पवार गटाचा विजय

हेही वाचा – ठाणे शहरात मनसेची प्रचारात केवळ हवाच, निकालात मात्र पिछेहाट

उत्तर महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचा एकमेव विजयी उमेदवार म्हणून अचानक नाईक यांचे महत्व वाढले आहे. नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण संस्थांची मालकी असलेल्या नाईक यांनी महाविकास आघाडीची तसेच काँग्रेसची इभ्रत राखली, अशी प्रतिक्रिया आघाडीतील नेत्यांकडून दिली जात आहे. नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा गड मानला जातो. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसचे गोवाल पाडवी यांनी भाजपच्या डाॅ. हिना गावित यांचा दणदणीत पराभव केला होता. मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी काँग्रेसला जिल्ह्यात एक जागा गमवावी लागली आहे.