पुणे : भाजपने आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ‘मिशन १२५’चा नारा दिल्यानंतर महायुतीत मित्रपक्षांमध्ये जुंपली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ‘एकला चलो’चा संदेश कार्यकर्त्यांना देण्यास सुरुवात केली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर शिवसेनेचे महानगरप्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील- ठोंबरे यांच्याकडून करण्यात येत असलेली उघड टीका ही राजकीय खेळी असून, महापालिका निवडणुकीपूर्वीची ‘वातावरण निर्मिती’ असल्याचे राजकीय गोटातून सांगण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपने गेल्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी ‘मिशन १२५’ हे लक्ष्य निश्चित करण्यात आले. मात्र, मित्रपक्षांवर टीका न करण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या. या निर्णयानंतर शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे महायुतीतील पक्ष आक्रमक झाले आहेत. महापालिका निवडणुकीत युती होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज येताच या दोन्ही पक्षांनी ‘एकला चलो रे’ संदेश देण्यास सुरुवात केली आहे. त्याचीच रणनीती म्हणून या दोन्ही पक्षांच्या नेते उघडपणे भाजपच्या नेत्यांवर टीका करू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
शिवसेना (शिंदे) पक्षाची पुण्यातील ताकद कमकूवत असल्याने त्यांना आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची साथ हवी आहे. शिवसेनेचा फारसा फायदा होणार नसल्याने भाजपची मात्र पुण्यात जागा वाटपात शिवसेनेला वाटा देण्याची तयारी नसल्याचे दिसून येते. त्यामुळे भाजपकडून ‘मिशन १२५’चा नारा देण्यात आला आहे. पुणे महापालिकेतील ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक निवडून येणार आहेत.
गेल्या निवडणुकीत भाजपचे ९७ नगरसेवक निवडून आले होते. १२५ जागा भाजपच्या वाट्याला आल्यास उर्वरित ४० जागांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांची बोळवण करण्याची भाजपची व्यूहरचना आहे. भाजपकडून डावलले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने भाजपला ‘लक्ष्य’ करण्यास सुरवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकेक प्रकरणावरून भाजपच्या नेत्यांवर जाहीर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या टोळीची कोथरुडमधील दहशतीच्या प्रकरणावरून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर धंगेकर यांनी जाहीर टीका केली. भाजपनेही धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांचे गुंड गजानन मारणे याच्याबरोबरचे छायचित्र आणि खेळण्यातील बंदूक घेतलेले छायाचित्र प्रसारित यावरून धंगेकर यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. धंगेकर यांनी त्याबाबतील स्पष्टीकरणही दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांना समज दिल्यानंतर ते शांत बसण्याऐवजी आणखी आक्रमक झाले आहे.
जैन बोर्डिंग प्रकरणात धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर जाहीरपणे आरोप करत आहेत. मोहोळ यांनी त्या आरोपांचे खंडन केले आहे. मात्र, त्यावरून भाजप आणि शिवसेनेतील वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची पुण्यात उपनगरी भागात ताकद आहे. भाजपबरोबर युती करण्यासाठी हा पक्ष इच्छुक आहे. मात्र, भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने स्वबळावर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्यात नमाज पठणाचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर त्यांच्याविरोधात ‘राष्ट्रवादी’ने प्रवक्त्या रुपाली पाटील-ठोंबरे यांना जाहीर भूमिका घेण्यात लावली आहे. त्यांनी खासदार कुलकर्णी यांच्याविरूद्धच गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या महायुतीतील मित्रपक्षांमध्ये जुंपली आहे. हीदेखील निवडणुकीपूर्वीची राजकीय खेळी असल्याचे सांगण्यात येते.