मुंबई : मुस्लीमबहुल मानखुर्द-शिवाजीनगर या मतदारसंघात समाजवादी पार्टीचे विद्यामान आमदार अबू आझमी आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) नवाब मलिक यांच्यात लढत होत असली तरी, या दोन्ही मुख्य उमेदवारांविषयी मतदारसंघात नाराजीची भावना दिसते. नवाब मलिक यांना भाजपने पाठिंबा दिलेला नसला तरी मलिक यांना मत म्हणजे भाजपला साथ अशी चर्चा मुस्लीम समाजात आहे. त्यामुळे एमआयएमच्या स्थानिक उमेदवाराच्या नावाची अधिक चर्चा आहे. पण एकूणच मुस्लीम समाजातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघात गेल्या चार वेळा समाजवादी पक्षाचे अबू आझमी हेच आमदार म्हणून निवडून येत आहेत. त्यांच्यासमोर यंदा राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नवाब मलिक यांचे आव्हान आहे. मुस्लीम समाजातील दोन मातब्बर नेते उभे असल्यामुळे आधीच या समाजामध्ये कोणाला मतदान करायचे यावरून संभ्रम आहे. मात्र गेल्या काही दिवसात इथल्या वस्त्यांमध्ये एमआयएमच्या उमेदवाराच्या नावाची जोरदार चर्चा आहे. या विभागातील विद्यामान आमदार अबू आझमी यांच्याविरोधात मतदारांमध्ये नाराजी आहे. शिवाजीनगर, मानखुर्द, गोवंडी या भागाचा गेल्या वीस वर्षांत काहीच विकास झाला नसल्याची भावना मतदारांमध्ये आहे. मात्र आझमी यांच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नसल्यामुळे तेच जिंकून येत होते. यावेळी मात्र अल्पसंख्याक उमेदवार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये या उमेदवारांबाबत चर्चा सुरू आहे.

हेही वाचा >>>ऐरोलीच्या बंडाला ‘ठाण्या’ची साथ ?

या मतदारसंघात यंदा आझमी आणि मलिक यांच्या बरोबरच माजी नगरसेवक मोहम्मद सिराज शेख (वंचित बहुजन आघाडी), सुरेश पाटील (शिवसेना -शिंदे गट), जगदीश खांडेकर (मनसे) तसेच अतिक खान (एमआयएम) हे उमेदवार आहेत. अतिक खान हे गोवंडी येथील रहिवासी आहेत. ते शिक्षक असून त्यांचे या विभागात शिकवणी वर्ग आहेत.

मलिकांबाबत मुस्लीम समाजाची सावध भूमिका

नवाब मलिक हे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार असून भाजपने त्यांना पाठिंबा दिलेला नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र ही केवळ निवडणूक खेळी असल्याची चर्चा इथल्या मतदारांमध्ये आहे. मलिक यांना मत म्हणजे भाजपला साथ देण्यासारखेच असल्याची या विभागात चर्चा आहे.

या मतदारसंघात गेली २०-२५ वर्षे बाहेरचा उमेदवारच दिला जात होता. मात्र येथील लोकांना आता स्थानिक उमेदवार हवा आहे. ज्याला येथील लोकांच्या समस्या माहीत आहेत असाच स्थानिक आणि शिकलेला उमेदवार हवा आहे.- फैय्याज शेख, गोवंडी सिटिजन वेल्फेअर फोरम

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mankhurd shivajinagar muslim community in confusion print politics news amy