नागपूर: नागपूर जिल्ह्यात भाजपने सध्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विरोधी पक्षाच्या आजी- माजी सदस्यांना पक्षात प्रवेश देण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार किंवा नाही हे निश्चित नाही. पण भाजपने मात्र पक्षात धडाक्यात इनकमिंग सुरू केल्याने वातावरण निर्मिती झाली आहे.
ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या. त्या कधी होणार याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजप नेत्यांनी सहा महिन्यात या निवडणुका होणारहे सांगणे सुरू केले. सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा करून ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवला जाईल, असा दावा केला जात आहे. एवढेच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर पक्षाच्या आजी-माजी सदस्यांना पक्षात प्रवेश देणे सुरू केले आहे. नुकताच जिल्हा परिषदेच्या माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या उज्वला बोकारो यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश घेतला.
वास्तविक बोढारे या विधानसभा निवडणुकीपासून मनाने भाजपवासी झाल्या होत्या. हिंगणा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा पूर्ण न झाल्याने त्यांनी तेव्हांच वेगळा मार्ग स्वीकारला होता. आता अधिकृतपणे भाजप प्रवेश झाला. पक्षप्रवेशाच्या वेळी जी नावे पुकारण्यात आली. त्यापैकी काहींनी नंतर आम्हाला न विचारता नावे घेण्यात आली असे जाहीर केले. बोढारेंमुळे हिंगणा मतदारसंघातील भाजप आमदार समीर मेघे यांची बाजू मजबूत झाली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश झाला.
त्यापूर्वी भाजपने उमरेड तालुक्यातील विरोधी पक्षातील विशेषतः कॉंग्रेसकडे असलेल्या काही ग्रामपंचायतींच्या सरपंचांना पक्षात प्रवेश दिला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी काटोल तालुक्यातील जि. प. सदस्य भाजपमध्ये गेले होते. आता काही माजी सदस्य संपर्कात असल्याचे सांगितले जाते.
जिल्हा परिषदेसाठी मोर्चेबांधणी
भाजपच्या दिग्गज नेत्यांचे नागपूर हे गृहशहर असल्याने पक्ष येथे होणाऱ्या कुठल्याही निवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावतो. जिल्हा परिषदेच्या निवडणुकाबाबत अनिश्चितता असली तरी त्या होणारच म्हणून भाजप जिल्ह्यात तयारीला लागली आहे. सध्या सुरू असलेल्या पक्ष प्रवेशाकडे सध्या याच अनुषंगाने बघितले जात आहे.असे असले तरी या आधी कॉंग्रेसने भाजपला जिल्ह्यातील निवडणुकीत धोबीपछाड दिल्याची उदाहरणे आहेत.