लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधींनी बिहारमध्ये प्रचारसभेदरम्यान भाजपावर परखड शब्दांत टीका केली होती. भारतीय जनता पक्ष मतांच्या राजकारणासाठी सणांचा वापर करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर २४ तासांच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मुझफ्फरपूरमधील प्रचारसभेत बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. एवढंच नाही, तर केंद्र सरकार छट पूजा महोत्सवाला थेट UNESCO चा टॅग मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची घोषणाही मोदींनी केली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

नरेंद्र मोदींनी बिहार विधानसभा निवडणूक २०२५ साठी घेतलेल्या सभेमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. “आमचं सरकार छट पूजा उत्सवाला युनेस्कोचा टॅग मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण जेव्हा तुमचा हा मुलगा छट पूजेला जगभरात प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असताना काँग्रेस व राजदचे नेते मात्र छटमातेचा अवमान करत आहेत. मला सांगा, कुणी मतांसाठी छटमातेचा अपमान करू शकतं का? बिहार आणि भारत हे सहन करेल का? छटपूजेच्या दिवशी उपवास करणाऱ्या माता हे सहन करतील का? राजद व काँग्रेस किती निर्लज्ज आहेत. त्यांच्यासाठी ही पूजा म्हणजे ड्रामा आणि नौटंकी आहे. तुम्ही अशा लोकांना शिक्षा करणार की नाही?” असं मोदी व्यासपीठावरून म्हणाले.

राजदनं बिहारचा नेहमीच विश्वासघात केला – नरेंद्र मोदी

दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राजदवरही तोफ डागली. “राजदनं नेहमीच बिहारचा विश्वासघात केला आहे. काँग्रेस आणि राजदनं काय केलंय बिहारसाठी? जंगलराजच्या लोकांनी काय केलंय? त्यांच्या कार्यकाळासाठी पाच शब्द आहेत. कट्टा (गावठी बंदूक), क्रूरता, कटुता, कुशासन आणि करप्शन”, अशा शब्दांत मोदींनी राजदवर टीका केली.

“बिहार के बेटा-बेटी बिहार में ही काम करेंगे”

बिहारमधील तरुणांना बिहारमध्येच रोजगार मिळेल, असं आश्वासन मोदींनी यावेळी दिलं. “बिहारचा गौरव वाढवणं, बिहारच्या गोड भाषेला प्रोत्साहन देणं, बिहारची समृद्ध संस्कृती जगभरात नेणं आणि बिहारचा विकास साध्य करणं ही एनडीए व भाजपासाठी प्राधान्याची बाब आहे. राजद व काँग्रेस बिहारला कधीच विकसित करू शकत नाही. अब बिहार का बेटा-बेटी पलायन नहीं करेगा, बिहार में ही काम करेगा, बिहार में ही नाम करेगा”, असंही मोदी यावेळी म्हणाले.

बिहारमध्ये सत्ताधारी एनडीएमधील भाजपा व नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस व राजदप्रणीत इंडिया आघाडीकडून सत्ता परत मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. विरोधकांनी नितीश कुमार सरकारवर प्रचारसभांमधून जोरदार हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. येत्या ६ व ११ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणीसह निकाल जाहीर केले जाणार आहेत.