मागील काही दिवसांपासून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे विरोधकांच्या ऐक्यासाठी प्रयत्न करत आहेत. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता विरोधकांचे ऐक्य घडवून आणण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीदेखील घेतल्या आहेत. दरम्यान आता देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची १२ जून रोजी पटणा येथे बैठक पार पडणार होती. मात्र या बैठकीच्या तारखेबद्दल मतभेद निर्माण झाल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता नितीश कुमार यांनी या बैठकीला पक्षांच्या प्रमुखांनीच उपस्थित राहायला हवे, असे मत व्यक्त केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आमच्याशी चर्चा न करताच बैठकीची तारीख निश्चित केली’

बैठकीच्या तारखेवरून विरोधकांमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. विरोधी पक्षातील एका नेत्याने तर बैठकीची तारीख निश्चित करण्यासाठी तसेच बैठक पुढे ढकलण्यासाठी आमचे मत जाणून घेतले नाही, अशी खंत व्यक्त केली आहे. “नितीश कुमार यांनी मला फोन करून विरोधी पक्षांची बैठक १२ जून रोजी होईल असे सांगितले. ही तारीख निश्चित करण्याआधी माझ्याशी कोणतीही चर्चा केली नाही. यासह बैठक पुढे ढकलण्यात आल्याचेही मला सांगितले नाही. बैठकीच्या तारखेबाबत सर्व पक्षांना विचारणा केलेली आहे का? असा प्रश्न मी नितीश कुमार यांना केला होता. त्यानंतर सर्वच पक्षांनी बैठकीसाठी १२ जून ही तारीख योग्य असल्याचे मला सांगितले आहे, असे मला नितीश कुमार यांनी सांगितले. मात्र तरीदेखील मी त्यांना बैठकीची तारीख निश्चित करण्याआधी सर्व पक्षांची संमती घ्यावी, असे सुचवले होते,” असे या नेत्याने सांगितले. बैठकीची तारीख आणि ठिकाण निश्चित करण्यासाठी सर्व पक्षांशी चर्चा केली असती तर ही स्थिती निर्माण झाली नसती, अशा भावनाही या नेत्याने व्यक्त केल्या.

हेही वाचा >>> असा एक पक्ष दाखवा ज्याचे भाजपाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध नाहीत; विरोधकांच्या एकजुटीवर माजी पंतप्रधान देवेगौडांचे परखड भाष्य

राहुल गांधी, खरगे बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत, काँग्रेसने दिली माहिती

नितीश कुमार यांनी विरोधकांची बैठक १२ जून रोजी होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर काँग्रेसने या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी खासदार राहुल गांधी उपस्थित राहू शकणार नाहीत, असे सांगितले होते. तर आमच्या पक्षातर्फे मुख्यमंत्रीपदावरचा एखादा नेता या बैठकीला उपस्थित राहील, असे काँग्रेसने कळवले होते.

जेडीयूने निवेदन जारी करत केली होती बैठकीची घोषणा

याआधी २२ मे रोजी नितीश कुमार यांनी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांच्या सोबत घेत खरगे आणि राहुल गांधी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली होती. या भेटीनंतर काँग्रेसने विरोधी पक्षांच्या बैठकीचे ठिकाण आणि तारीख आगामी २ ते ३ दिवसांत जाहीर करू, असे सांगितले होते. मात्र साधारण सहा दिवसांनंतर जेडीयू पक्षाने निवेदन जारी करत येत्या १२ जून रोजी पटणा येथे विरोधी पक्षांची बैठक होईल, असे जाहीर केले होते.

हेही वाचा >>> रावसाहेब दानवेंनी आतापासूनच निवडणुकीसाठी कंबर कसली

…म्हणून बैठक पुढे ढकलावी लागली

सध्या राहुल गांधी १८ जूनपर्यंत अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे विरोधकांची बैठक २० जूननंतर व्हावी अशी काँग्रेसची इच्छा होती. काँग्रेस पक्षासह अन्य विरोधी पक्षदेखील १२ जून रोजीच्या बैठकीला अनुकूल नव्हते. डीएमके पक्षाचे नेते तथा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलीन आणि सीपीआयएम पक्षाने आम्ही १२ जून रोजी बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत, असे जेडीयू पक्षाला सांगितले होते. तसेच बैठक पुढे ढकलावी अशी मागणी डीएमकेने केली होती.

१२ जून रोजीच्या बैठकीला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर डीएमकेने आम्ही या बैठकीला लोकसभेचे खासदार आणि वरिष्ठ नेते कानीमोझी हे उपस्थित राहतील, असे जेडीयू पक्षाला कळवले. तर काँग्रेसनेदेखील खरगे आणि राहुल गांधी बैठकीला उपस्थित राहणे शक्य नसल्यामुळे मुख्यमंत्रीपदावर असलेल्या नेत्याला या बैठकाली पाठवू असे सांगितले होते. मात्र आता १२ जून रोजीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

हेही वाचा >>> लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे उत्तर प्रदेशकडे विशेष लक्ष, ‘टीफीन पे चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न! 

बैठकीला पक्षांच्या प्रमुखांनी उपस्थित राहावे- नितीश कुमार

बैठक पुढे ढकलण्याच्या निर्णयावर नितीश कुमार यांनी भाष्य केले आहे. “काँग्रेस तसेच अन्य पक्षांनी आम्ही १२ जून रोजी बैठकीस उपस्थित राहू शकत नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. सर्व पक्षांशी चर्चा केल्यानंतर या बैठकीसाठी योग्य ती तारीख निश्चित केली जाईल. मात्र मला एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे की, या बैठकीला प्रत्येक पक्षाच्या प्रमुखानेच उपस्थित राहणे गरजेचे आहे. जर एखादा पक्ष पक्षाध्यक्षांशिवाय अन्य नेत्याला प्रतिनिधी म्हणून पाठवणार असेल तर ते स्वीकारले जाणार नाही. काँगेस पक्ष त्यांच्या अध्यक्षांऐवजी पक्षाच्या प्रतिनिधीला पाठवणार होता. हे चुकीचे आहे,” असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले.

अन्यथा या बैठकीला महत्त्व उरणार नाही- नितीश कुमार

पटणा येथे होणाऱ्या बैठकीचा गांभीर्य कायम राहावे यासाठी नितीश कुमार प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. पक्षांचे प्रमुख या बैठकीस उपस्थित न राहिल्यास, या बैठकीचा गांभीर्य नाहीसे होईल. त्यामुळे नितीश कुमार या बैठकीला पक्षाच्या प्रमुखांनीच उपस्थित राहावे, अशी अपेक्षा करत आहेत.

हेही वाचा >>> सोलापूरमध्ये पाय रोवण्यावर भारत राष्ट्र समितीचा भर, भगीरथ भालके चंद्रशेखर राव यांच्या भेटीला

विरोधकांच्या ऐक्याची जबाबदारी नितीश कुमार यांच्यावर

दरम्यान, सध्यातरी काँग्रेसने विरोधकांच्या ऐक्याची जबाबदारी नितीशकुमार यांच्यावर सोपवली आहे. देशात डीएमके, एनसीपी, आजेडी, जेएमएम, सीपीआयएम या पक्षांची वेगवेगळ्या राज्यांत काँग्रेसशी युती आहे. तर तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी यासारख्या पक्षांचा काँग्रेसला विरोध आहे. त्यामुळेच काँग्रेसने विरोधकांच्या ऐक्याची जबाबदारी नितीश कुमार यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे आगामी काळात विरोधकांचे ऐक्य सत्यात उतरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar said all party chief should present for opposition party meeting in patna prd