संसदेच्या पाच दिवसीय अधिवेशनात लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले. हे अधिवेशन संसदेच्या नव्या इमारतीत घेण्यात आले. याच कारणामुळे हे पाच दिवसीय अधिवेशन विशेष ठरले. मात्र याच अधिवेशनात भाजपाचे खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा पक्षाचे खासदार दानिश अली यांना थेट दहशतवादी, मुल्ला म्हणत हिणवल्यामुळे देशभरातून संताप व्यक्त केल गेला. हेच प्रकरणात आता संसदेच्या विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले आहे. विशेषाधिकार समितीतर्फे बिधुरी यांच्या या विधानाची सखोल चौकशी होणार आहे. या प्रकरणासह भाजपाच्या खासदारांनी केलेल्या तक्रारींचीही चौकशी ही समिती करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रमेश बिधुरी यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची विरोधकांची मागणी

रमेश बिधुरी यांनी लोकसभेत बोलताना बहुजन समाज पार्टीचे (बसपा) खासदार दानिश अली यांच्यावर असंसदीय शब्दांत टिप्पणी केली होती. त्याचे पडसाद नंतर देशभर उमटले होते. दानिश अली आणि विरोधी पक्षातील खासदारांनी रमेश बिधुरी यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली होती. मात्र भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे लोकसभेत विरोधी पक्षांनी आतापर्यंत अयोग्य शब्दांत केलेल्या सर्व टीकांची चौकशी करावी ,अशी मागणी केली.

लोकसभेच्या विशेषाधिकार समितीत एकूण १४ सदस्य

रमेश बिधुरी यांनी केलेल्या विधानासह या प्रकरणाशी निगडित सर्व प्रकरणांची चौकशी विशेषाधिकार समितीच करणार आहे. तशी माहिती लोकसभेच्या सचिवालयाने दिली आहे. लोकसभेच्या विशेषाधिकार समितीत एकूण १४ सदस्य आहेत. यात आठ सदस्य हे भाजपाचे आहेत. तर या समितीचे प्रमुख सुनिलकुमार सिंह असून तेही भाजपाचेच नेते आहेत. बिधुरी यांच्या प्रकरणासह भाजपाच्या नेत्यांनी विरोधकांविरोधात केलेल्या तक्रारींचीही चौकशी होणार आहे.

चांद्रयान-३ मोहिमेवरील चर्चेदरम्यान वाद

बिधुरी यांनी केलेले विधान लोकसभा कामकाजाच्या नोंदीतून हटवण्यात आले आहे. लोकसभेत भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेबाबत चर्चा सुरू होती. यावेळी बिधुरी बोलत होते. याच वेळी विरोधी बाकावरून दानिश अली टीका करत होते. परिणामी बिधुरी यांनी दानिश अली यांच्याकडे बोट करून असंसदीय शब्दांचा वापर केला. बिधुरी यांनी दानिश अली यांची मुल्ला, दहशतवादी म्हणत अवहेलना केली. बिधुरी यांच्या या विधानानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला. बिधुरी यांच्यावर तत्काळ कडक कारवाई व्हावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती.

राजनाथ सिंह यांनी मागितली होती माफी

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच क्षणी भाजपाचे नेते तथा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सभागृहाची माफी मागितली होती. असे असले तरी दानिश अली यांनी बिधुरी यांना अपशब्द वापरण्यास परावृत्त केले, असा दावा भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला. या घटनेनंतर सर्व विरोधी पक्षांनी दानिश अली यांना पाठिंबा दिला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, केसी वेणुगोपाल यांनी दानिश अली यांची प्रत्यक्ष भेट घेतली. तसेच डीएमके, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांनी बिधुरी यांनी केलेल्या विधानाची विशेषाधिकारी समितीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.

बिधुरी यांना नोटीस, १० दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

वाढता विरोध लक्षात घेता बिधुरी यांनी केलेल्या विधानाची भाजपाने दखल घेतली. भाजपाने बिधुरी यांना नोटीस बजावली असून केलेल्या विधानाविषयी १० दिवसांच्या आत उत्तर द्या, असे निर्देश दिले. सूत्रांच्या माहितीनुसार बिधुरी यांच्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संताप व्यक्त केला. केंद्र सरकारने महिला आरक्षणाचे विधेयक मांडले होते. या विधेयकाची सगळीकडे चर्चा सुरू असताना बिधुरी यांनी आक्षेपार्ह विधाने केली. त्यामुळे विधेयकाची चर्चा मागे पडली. याच कारणामुळे मोदी यांना नाराजी व्यक्त केली.

रमेश बिधुरी यांच्यावर नवी जबाबदारी

दरम्यान, हे प्रकरण ताजे असतानाच भाजपाने बिधुरी यांच्यावर राजस्थानमधील टोंक जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. लवकरच राजस्थानमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची तयारी करण्यासाठी बिधुरी यांची टोंक जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. टोंक जिल्ह्यात मुस्लिमांचे प्रमाण बरेच आहे.

भाजपाचे खरे चरित्र उघडे पडले- दानिश अली

बिधुरी यांच्या या नियुक्तीनंतर दानिश अली यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपावर टीका केली. “भाजपाचे खरे चरित्र उघडे पडले आहे. आक्षेपार्ह विधान केल्यानंतर बिधुरी यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवून त्यांना एका प्रकारे पुरस्कारच देण्यात आला आहे,” असे दानिश अली म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramesh bidhuri given new responsibility in bjp who made offensive remarks against bsp mp danish ali prd