रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर पालिका व तीन नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या निवडणुकीमधील चुरस चांगलीच वाढली आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड व राजापूर या चार नगर पलिका तर गुहागर, संगमेश्वर व लांजा अशा तीन नगर पंचायतींमध्ये या निवडणूकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्ह्यात लढत ही महायुती अंतर्गत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये होण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात जाहीर केल्या आहेत. या निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या निवडणुकीचा धुरळा उडविण्यास राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांनी आचारसंहिता जाहीर होताच पक्षांची आणि इच्छुकांची धावपळ सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार आणि आपले वर्चस्व कोण राखणार? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र याचे सर्व चित्र ३ डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकिय पक्षांनी या निवडणूकीसाठी कंबर कसली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील या चार नगर परिषदा व तीन नगर पंचायतींमध्ये नगराध्यक्ष थेट जनतेतुन निवडले जाणार आहेत. जिल्ह्यातील एकूण १०१ प्रभागांमध्ये १५१ सदस्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी २०० मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यात एकूण १ लाख ६० हजार ४४८ इतके मतदार आहेत. यामध्ये ८२ हजार ५६२ महिला तर ७७ हजार ८८५ पुरूष मतदार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने तीन टप्प्यात निवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये नगर परिषद व नगर पंचायत पहिल्या टप्प्यात तर जि.प. आणि पं.स. दुसऱ्या टप्प्यात होणार आहेत. महानगर पालिकाचा तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड या नगर परिषद तर गुहागर , संगमेश्वर आणि लांजा या ठिकाणी नगर पंचायती असून यांची मुदत संपल्याने या पालिकांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. रत्नागिरी नगर परिषदेमध्ये यापूर्वी शिवसेनेचा नगराध्यक्ष होता. चिपळूणमध्ये भाजपा तर खेडमध्ये मनसेचा नगराध्यक्ष तर राजापूरात काँग्रेसचा नगराध्यक्ष होता. तसेच लांजा आणि गुहागर नगर पंचायतीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष होता. तर देवरुखमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष होता. मात्र आता या होणा-या निवडणुकांमध्ये या सर्वांनाच आपले वर्चस्व टिकविण्याचे आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात होत असलेल्या या निवडणूकीत महायुती व महाविकास आघाडी आपली स्वतंत्र ताकद आजमावणार असल्याने ही निवडणूक रंगतदार होणार आहे. त्यामुळे जिल्हावासियांचे जास्तच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या या स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खरी लढत महायुतीमध्ये बघायला मिळणार असल्याचे चित्र आहे. सत्तेतील भाजप व शिवसेना शिंदे गटात ही लढत चुरशीची होणार आहे. यासाठी दोन्ही बाजू कडून सावध भूमिका घेतली जात आहे. या सत्तेतील दोन्ही पक्षातील वादाचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता ही वर्तविली जात आहे. राणे पिता पुत्रांनी रत्नागिरी जिल्ह्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या वर्चस्वाला आव्हान दिल्याने खरी रंगत या निवडणुकांना आली आहे. आता पुढील काही दिवस भाजपाचे नेते व मंत्री व पालकमंत्री उदय सामंत व इतर नेते जिल्ह्यात ठाण मांडून बसणार यात काही शंका नाही. मात्र निवडणुकीचा निकालच या नेत्यांचे अस्तित्व सिध्द करणार आहे.