अविनाश पाटील

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतल्याने सत्तेतून पायउतार व्हावे लागलेल्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्यानंतर एकामागोमाग एक धक्केच सहन करावे लागत आहेत. अशा स्थितीत शिवसेनेला पुन्हा सावरण्यासाठी, शिवसैनिकांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांमध्ये सुरु केलेल्या दौऱ्याला सर्वत्र आश्चर्यजनक प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी बंडखोरांसमवेत स्थानिक पदाधिकारीही शिंदे गटात सामील झालेले असताना दौऱ्यात मोठ्या प्रमाणावर जमणारी गर्दी अजूनही सामान्य शिवसैनिक मातोश्रीशी एकनिष्ठ असल्याचे अधोरेखित करीत असून नेमकी हीच गोष्ट बंडखोरांना अस्वस्थ करीत आहे.

मंत्री, आमदार, खासदार बाहेर पडले तरी सामान्य शिवसैनिक शिवसेनेसोबतच राहत असल्याचा इतिहास आहे. त्याचेच काहीसे प्रत्यंतर आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान येत आहे. सध्यातरी शिवसेनेकडून आदित्य हेच दौरे काढून विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात आदित्य यांची शिवसंवाद यात्रा आतापर्यंत गेली असून कुठे भर पावसात, कुठे आगमनास चार तासांचा उशीर होऊनही स्वागतासाठी थांबून राहिलेली गर्दी शिवसेनेसाठी दिलासादायक ठरली आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगावपासून पाचोऱ्याकडे जात असताना मार्गावरील सामनेर, नांद्रा, हडसन यासारख्या छोट्या छोट्या गावांमधूनही आदित्य यांच्या स्वागतासाठी पुढे येणारे ग्रामस्थ, हे दृश्य विरोधकांना निश्चितच अस्वस्थ करणारे म्हणावे लागेल. या गर्दीत विशेषत्वाने युवावर्गाचे प्रमाण अधिक. दौऱ्यात त्या त्या ठिकाणच्या बंडखोरांवर आरोप, टीका होणे साहजिक असले तरी प्रत्येक ठिकाणच्या जाहीर सभांमध्ये गद्दार हा समान धागा असल्याने आदित्य यांच्याकडून त्यावरच अधिक भर दिला जात आहे. बंडखोरांच्या गद्दारीचा उल्लेख केल्यावर गर्दीकडूनही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा… नवनीत राणांच्‍या खासदारकीमागे नेमके कुणाचे आशीर्वाद? पवार की फडणवीस? नव्‍या दाव्‍याने राणा दाम्‍पत्‍य पुन्‍हा चर्चेत

हेही वाचा… हिंगोली : कळमनुरीतील डॉ. संतोष टारफे, अजित मगर यांची पक्षीय सीमोल्लंघनाची तयारी

बंडखोरी, मंत्रिमंडळ स्थापनेनंतरची स्थिती, बंडखोरांना मिळालेली खाती, शिंदे गटापेक्षा भाजपला मिळालेला अधिक निधी, मंत्रीपद न मिळाल्याने बंडखोरांची नाराजी, ठाकरे घराण्यावरील निष्ठा या सर्व विषयांची गुंफण आदित्य हे आपल्या भाषणांमधून करीत आहेत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगावात शिवसंवाद यात्रेच्या स्वागतासाठी लावलेले फलक रात्रीच फाडण्यात आल्याची घटना आदित्य यांना बंडखोरांवर तोंडसुख घेण्यासाठी पूरकच ठरली. मालेगाव येथे नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिराने तेही रात्री; आदित्य पोहचले असतानाही त्यांच्या स्वागतासाठी बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्या बालेकिल्ल्यात गर्दी थांबून होती. भुसे यांना याआधीच्या कृषिपेक्षा तुलनेने कमी महत्वाचे खाते मिळाल्याचा उल्लेख करुन त्यांचा कसा उपमर्द शिंदे गटात होत आहे, हे दर्शविण्याचा प्रयत्न आदित्य यांनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rebels are upset due to tremendous for aditya thackeray rally print politics news asj