मुंबईत राष्ट्रवादीची ताकद तुलनेत कमी असल्यानेच महाराष्ट्र दिनी वांद्रे – कुर्ला संकुलात होणारी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा यशस्वी करण्याची सारी जबाबदारी ही शिवसेना आणि काँग्रेसवर टाकण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद मर्यादित असल्याने तेथील सभा यशस्वी करण्याची सारी जबाबदारी काँग्रेसवर टाकण्यात आली होती. काँग्रेसचे स्थानिक नेते आमदार सुनील केदार यांनी ही सभा यशस्वी केली होती. सभेला चांगली गर्दी झाली होती. छत्रपती संभाजीनगरमधील सभेसाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जोर लावला होता. संपूर्ण मराठवाड्यातून ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. मुंबईतील व तीही ‘मातोश्री’च्या अंगणात होणारी जाहीर सभा यशस्वी करण्याची सारी जबाबदारी ठाकरे गटाची आहे. याशिवाय मुंबईत काँग्रेसचीही चांगली ताकद आहे. यातून दोन पक्षांनी सभा यशस्वी करण्याकरिता पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा – खरगेंचा संयम सुटल्यामुळे भाजपची खेळी यशस्वी!

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुंबईत शिवसेनेत मोठ्या प्रमाणात फूट पडलेली नाही. शिंदे यांनी बरेच प्रयत्न केले तरीही ठाकरे यांना मानणारा कार्यकर्त्यांचा संच त्यांच्या गळाला लागलेला नाही. सभेतच्या निमित्ताने मुंबईत ताकद दाखवून देण्याची उद्धव ठाकरे यांना संधी आहे. महाविकास आघाडीच्या आतापर्यंत झालेल्या दोन्ही सभांमध्ये उद्धव ठाकरे यांचेच प्रमुख भाषण झाले होते. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, शिंदे यांच्या बंडानंतरही पक्षाची ताकद कायम आहे हे वज्रमूठ सभेच्या माध्यमातून शिवसेना सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. यामुळेच जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सोमवारच्या सभेला उपस्थित राहण्याचे संदेश शाखांमधून देण्यात आले आहेत. शिवसेनेने सभेची तयारी त्या दृष्टीने केली आहे.

मुंबई काँग्रेसमध्ये मरगळ आली आहे. ही मरगळ दूर करण्याचा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचा प्रयत्न आहे. सभा यशस्वी करण्याकरिता भाई जगताप यांनी गेले आठवडाभर मुंबईतील विविध भागांना भेटी देऊन नेते मंडळींमध्ये विश्वासाचे वातावरण तयार केले. मुंबईत काँग्रेसची चांगली ताकद आहे. सोमवारच्या सभेत ही ताकद दिसेल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – मोदी-भागवत नागपुरात अखेर एका व्यासपीठावर आलेच नाहीत

राष्ट्रवादीची मुंबई ताकद मर्यादित असली तरी ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कुमक आणण्याची तयारी राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वत्र वज्रमूठ सभेचे आव्हाड यांनी ठिकठिकाणी फलक लावून वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Responsibility on shiv sena and congress for gathering crowds for the vajramuth meeting in mumbai print politics news ssb