नागपूर : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या प्रयत्नाचा सर्वत्र निषेध केला जात आहे. मात्र राज्यातील महायुती सरकारमधील नागपुरातील मंत्री किंवा नेत्यांनीही अद्याप या घटनेवर प्रतिक्रिया दिली नाही. विशेष म्हणजे गवई ज्या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतात त्या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीही मौन बाळगले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नागपुरातील विधान परिषद सदस्य कृपाल तुमाणे यांनी मात्र ‘ ही घटना म्हणजे लोकशाहीवर थेट हल्ला’ अशी प्रतिक्रिया देऊन पुन्हा एकदा स्वत:चे वेगळेपण दाखवून दिले आहे.
वास्तविक सरन्यायाधीश विदर्भातील. अमरावती हे त्यांचे मूळ शहर आणि उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड्पीठात ते न्यायमूर्ती होते. सरन्यायाधीश झाल्यानंतर या दोन्ही शहरात त्यांचा हृद्द सत्कारही झाला. त्यामाळे सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या ‘त्या’ प्रसंंगाचा वैदर्भीयांना धक्का बसला. समाजाच्या सर्वच क्षेत्रातून त्याचा निषेध झाला. अपवाद ठरले ते फक्त सत्ताधारी पक्षातील नेते. भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखऱ् बावनकुळे यांच्याकडे नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. त्यांच्याकडून निषेधाची प्रतिक्रिया आली नाही. ऐरवी ते नागपुरात आल्यावर त्यांच्या कामकाजाची सुरूवातच माध्यम संवादाने होते. ही बाब लक्षात घेतली तर त्यांच्याकडून या घटनेचा निषेध लगेच होणे अपेक्षित होते.
खुद्द भाजप नेतेच या प्रकरणावर मौन बाळगून असल्याने मित्र पक्षाकडून प्रतिक्रिया येणारच नाही, असे वाटत असताना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने यांनी मात्र या घटनेची तीव्र शब्दात निंदा केली. भाजपने या प्रकरणात संशयास्पद मौन बाळगले असताना तुमाने यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया म्हणूनच महत्वाची ठरते. कारण, भाजपला मित्र पक्षाचे अस्तित्व नागपुरात मान्य नाही. शिवसेना एकसंघ होती तेव्हाही भाजपचे धोरण फरफटत नेण्याचेच होते, आताही त्यांना तीच अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर तुमाने यांनी एखाद्या मुद्यावर भूमिका मांडणे पक्षीय आवाजाची अनुभूती देणे होय. यापूर्वीही तुमाने यांनी अनेक मुद्यांवर मांडलेली भूमिका ही महायुती किंवा भाजपच्या धोरणाला अनुकूल न ठरणारी होती. मात्र त्यांनी माघार घेतली नव्हती हे येथे उल्लेखनीय.
काय आहे तुमानेंची प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान झालेल्या भ्याड हल्ल्याच्या प्रयत्नाचा मी तीव्र निंदा करतो. हा प्रकार केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नाही, तर तो भारतीय न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर आणि लोकशाही मूल्यांवर थेट आघात आहे, अशा शब्दात विधान परिषद सदस्य आमदार कृपाल तुमाने यांनी निषेध व्यक्त केला. सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा त्यांनी समाजमाध्यमावर निषेध नोंदविला. ते म्हणाले की, भर न्यायालयात एका वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न हा अत्यंत लाजीरवाणा आणि खेदजनक आहे. अशा प्रकारचे कृत्य करणे हे संविधानविरोधी आहे. न्यायमूर्ती भूषण गवई हे संविधानाचे निष्ठावंत रक्षक आणि समाजातील सर्व घटकांना समान न्याय देण्याचे कार्य सतत करत आले आहेत, असे तुमाने यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत नमुद केले आहे.