शिवसेनेचे कोकणावर जितके प्रेम आहे तितके विदर्भावर नाही. मात्र विदर्भात कोकणातील नेते संपर्क प्रमुख म्हणून पाठवण्याची परंपरा शिवसेनेत फार पूर्वी पासून आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.अलिकडेच पूर्व विदर्भ समन्वयक या पदावरून भंडा-याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागेवर कोकणातील नेते माजी मंत्री दीपक सावंत याची पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली.
शिवसेना एकसंध होती तेंव्हाही मुंबई किंवा कोकणातील नेत्यांची नियुक्ती विदर्भातील विविध जिल्ह्यांचे संपर्क प्रमुख म्हणून केली जात . त्याचा संपर्क कमी आणि स्थानिक राजकारणात हस्तक्षेप अधिक राहायचा. त्यांच्या शब्दाला मातोश्रीवर वजन असायचे. त्यामुळे जिल्हा प्रमुख आणि अन्य स्थानिक नेते संपर्क प्रमुखांच्या सरबराईत व्यग्र असायचे. यामुळेच शिवसेना पूर्व विदर्भात कधी वाढली नाही. संपर्क प्रमुखाशी वाद झाल्यानंतर अनेक कट्टर नेत्यांनी पक्ष सोडला काही मागे पडले. मात्र याला काही अपवादही आहेत. काहींनी पक्ष वाढीसाठी कष्ट वेचले. दिवाकर रावते, गजानन कीर्तीकर, नागपूर जिल्ह्यात संजय निरुपम, विनायक राऊत अशी अनेक नावे घेता येईल.
मुंबई- कोकणातील नेत्यांची नाळ वैदर्भीय जनतेशी कधी जुळलीच नाही. या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या शिवसेनेने विदर्भातील नेत्यांकडेच या भागातील संघटनेची जबाबदारी सोपवणे सुरू केले. शिवसेना एकसंध असताना पासून एकनाथ शिंदे सोबत राहणारे नागपूरचे किरण पांडव यांना शिंदे यांनी पक्षफुटीनंतर पूर्व विदर्भाचे संघटक केले. विदर्भातील दिग्रसचे आमदार व मंत्री संजय राठोड यांना विदर्भाचे संपर्क प्रमुख केले. विदर्भातीलच रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल यांना पूर्व विदर्भाचे संपर्क मंत्री केले.भंडा-याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना पूर्व विदर्भाचे समन्वयक नेमले.
एकूणच विदर्भातील पक्षाची सुत्रे याच भागातील नेत्यांच्या हाती देऊन संघटने वरील मुंबई- कोकणाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला. मूळ शिवसेनेपेक्षा शिंदे यांनी घेतलेली ही वेगळी भूमिका होती व ती सर्व सामान्य कार्यकर्त्यांना आपलीशी वाटली होती.
विदर्भातील नेत्यांची पायखेचू वृत्ती
शिदेंच्या शिवसेनेत पूर्व विदर्भाती सुत्रे किरण पांडव, आशीष जयस्वाल यांच्याकडे एकवटली होती. त्याला आव्हान नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांच्याकडे समन्वय हा पदाची जबाबदारी आल्यावर दिले. नव्या नियुक्तया केल्या. भंडा-याच्या बाहेर भोंडेकर हे सेनेचे नेते आहेत हे लोकांना कळले. प्रस्थापितांना हे सहन झाले नाही. भोंडेकर यांच्या विरूद्ध तक्रारी शिंदे यांच्याकडे झाल्या आणि भोंडेकर यांना लगाम लावण्यासाठी कोकणातील सेनेचे नेते व माजी मंत्री दीपक सावंत यांची पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती केली. ते उध्दव ठाकरे सोबत होते तेंव्हा त्यांनी ही जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे त्यांना पूर्व विदर्भातील पक्षाची संघटनात्मक माहिती आहे. पण त्याच्या निमित्ताने मुंबई- कोकणातील नेत्याच्या हाती पक्षाची सुत्रे गेली. भोंडेकर विरोधक यासाठी जबाबदार ठरले.