पुणे : काँग्रेसमध्ये असताना कसबा विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुकीत विजय मिळवून राज्याचे लक्ष वेधून घेणारे आणि त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही मेफेड्रॉन अमली पदार्थ तस्करी, कोरेगाव पार्कमधील पोर्शे अपघात प्रकरण गाजविणारे, शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केल्यावर महानगर प्रमुखपदी वर्णी लागल्यानंतर कोथरुडमधील गुन्हेगारीवरून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि जैन बोर्डिंग प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य करून ‘स्टार’ झालेले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामागे कोणाचा हात आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शिवसेना (शिंदे) पक्षाने नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी ‘स्टार प्रचारक’ जाहीर केले आहेत. ४० जणांच्या यादीत माजी आमदार धंगेकर यांना स्थान देण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. स्टार प्रचारकांमध्ये पुणे जिल्ह्यातील खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. महानगरप्रमुखपदी मे महिन्यात नियुक्ती झाल्यानंतर धंंगेकर हे गेल्या पाच महिन्यांपासून सतत कार्यरत आणि चर्चेत राहिले आहेत. पुण्यात

शिवसेना (शिंदे) पक्षाचे अस्तित्त्व त्यांनी कायम दाखवून दिले आहे. त्यांचे कार्यक्षेत्र हे पुणे शहर असले, तरी पुणे जिल्ह्यातही त्यांच्या नावाचे वलय आहे. त्यादृष्टीने ते शिवसेनेचे स्टार प्रचारक समजले जातात. मात्र, स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांना स्थान देण्यात आलेले नाही.

जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केल्यानंतर त्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांना शांततेचा सल्ला दिला. मात्र, त्यांची पाठराखण केली. त्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीजे जमीन व्यवहार प्रकरण उघडकीस आल्यानंतर धंंगकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची भूमिका घेतली.

नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीत पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार उभे आहेत. त्यांच्या प्रचाराची धुरा धंगेकर यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, स्टार प्रचारकांपासून धंगेकर यांना दूर ठेवण्यात आले आहे. भाजपच्या नेत्यांविरोधात घेतलेली उघड भूमिका कारणीभूत ठरली का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’चे पुण्यातील चारजण राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने ४० जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्याचे कृषी मंंत्री दत्तात्रय भरणे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि विकास पासलकर ही पुण्यातील चारजण आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुणे जिल्ह्यावर प्राबल्य असल्याने त्यांनी पुण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाची पुणे शहर आणि जिल्ह्यात तुलनेने ताकद कमी असताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्यासाठी माजी आमदार धंगेकर यांची स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, धंगेकर यांचा नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग कमी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.