Shivsena Uddhav Thackeray : पहलगाम येथील दहशतवादी हल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याची माहिती देण्यात आली. या मोहिमेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बाजू मांडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना केली. या शिष्टमंडळात शिवसेना शिंदे गटाच्या खासदारासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला. मात्र, ठाकरे गटाच्या एकाही खासदाराचे नाव शिष्टमंडळात घेण्यात आलं नव्हतं. यावरून खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना मंगळवारी (तारीख २० मे) दिल्लीतून केंद्रीय मंत्र्यांचा फोन आला.
शिवसेना ठाकरे गटाच्या एका खासदाराला केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सहभागी करून घेण्यात आले. खासदार प्रियंका चतुर्वेदी देशभरातील इतर खासदारांसह या शिष्टमंडळाचा भाग असतील, अशी पोस्ट ठाकरे गटाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. मंगळवारी दिलेल्या निवेदनात शिवसेना ठाकरे गटाने म्हटलंय, “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पंतप्रधानांना पाठिंबा दर्शविला आहे. विशेषतः पाक-आधारित दहशतवादाविरुद्ध आणि त्यांचे पायाभूत सुविधा आणि तळ नष्ट करण्यासाठी हा पाठिंबा देण्यात आला आहे. दहशतवादाविरुद्ध कारवाईमध्ये आपण सर्वजण एक आहोत, याबद्दल कोणतेही दुमत असू नये.”
ठाकरे गटाने निवेदनात काय म्हटलंय?

ठाकरे गटाने निवेदनात असंही म्हटलंय की, “हे शिष्टमंडळ राजकारणाबद्दल नाही, तर दहशतवादाविरुद्ध भारताच्या भूमिकेबद्दल आहे. आम्ही सरकारला आश्वासन दिलंय की, या शिष्टमंडळाद्वारे देशासाठी जे योग्य आणि आवश्यक आहे ते आम्ही करू. दहशतवादाविरुद्ध काम करणाऱ्या सशस्त्र दलांसोबत आपण सर्वजण एक आहोत यात शंका नाही. पहलगाममधील राजनैतिक परिस्थिती आणि अयशस्वी गुप्तचर/सुरक्षा प्रणालीबद्दल आमचे स्वतःचे मत आहे आणि आम्ही आमच्या देशाच्या हितासाठी आमच्या देशात प्रश्न विचारत राहू. पण, पाकिस्तान आधारित दहशतवादाचा पर्दाफाश करण्यासाठी आपण जागतिक स्तरावर एकत्र आले पाहिजे, जेणेकरुन तो नष्ट करता येईल”, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

आणखी वाचा : Maharashtra Politics : महायुतीमध्ये छगन भुजबळांचं महत्व का वाढलं?

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळाची घोषणा केल्यानंतर त्यात ठाकरे गटाच्या एकाही खासदाराचा समावेश नव्हता. यावरून खासदार संजय राऊत यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करीत केंद्र सरकारवर टीका केली होती. “शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेत नऊ खासदार आहेत. शरद पवार गट व एकनाथ शिंदे गटाच्या तुलनेत आमच्याकडे एक खासदार जास्त आहे. लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का? खरं म्हणजे एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी आम्हाला मिळाली पाहिजे होती, यावरून स्पष्ट होते की सरकार इथेही राजकारण करत आहे, असं राऊत म्हणाले होते.

“पंतप्रधानांवर नौटंकी करण्याची वेळ आली”

“सरकारी खर्चाने हे वऱ्हाड पाठवायची तशी गरज नव्हती, हे वऱ्हाड निघाले आहे, युरोपला, आफ्रिकेला, पण ते जाऊन काय करणार आहेत? परदेशात आपले हाय कमिशन आहे, ते काम करत आहेत. मग काय गरज आहे?”, असा प्रश्न खासदार राऊत यांनी उपस्थित केला होता. “जगात हे प्रश्न घेऊन जात आहेत याचा अर्थ पंतप्रधान कमजोर आहेत. पंतप्रधान २०० देश फिरले तरी एकही देश पाठीशी उभा राहिला नाही. म्हणून त्यांच्यावर ही नौंटकी करण्याची वेळी आली आहे. इंडिया आघाडीचे जे सदस्य चालले आहेत, त्यांनी या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”, अशी टीकाही त्यांनी केली होती.

हेही वाचा : Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचे निम्मे नगरसेवक शिंदे गटात; मुंबई महापालिकाही ताब्यातून जाणार?

युसुफ पठाणऐवजी अभिषेक बॅनर्जी

खासदारांच्या या शिष्टमंडळात पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार व माजी भारतीय क्रिकेटपटू युसुफ पठाण यांचं देखील नाव होतं. मात्र, त्यांनी या शिष्टमंडळाबरोबर जाणार नसल्याचा निर्णय घेतला. यावरून बरेच राजकारण झाले. युसुफ पठाण यांच्यावर चौहेबाजूने टीकेची झोड उठली. दरम्यान, यानंतर तृणमूल काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. पठाण यांचे शिष्टमंडळातून नाव वगळण्यात आलं आहे. त्यांच्या जागी तृणमूलने खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या नावाची शिफारस केली आहे. ज्याला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मान्यता दिली आहे. तृणमूल काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. “आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की, पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी दहशतवादाविरुद्ध भारताच्या जागतिक स्तरावरील प्रचारासाठी तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना नामांकित केले आहे,” असं तृणमूलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शिष्टमंडळं कोणकोणत्या देशात जाणार?

ऑपरेशन सिंदूरची माहिती महत्त्वाच्या देशांना देण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांची सात शिष्टमंडळं तयार केली आहे. या शिष्टमंडळांत विविध पक्षांचे ५१ राजकीय नेते, खासदार आणि माजी मंत्र्यांचा समावेश आहे. यातील एका शिष्टमंडळाचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे करणार आहेत. तर दुसऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व भाजपाचे नेते रविशंकर प्रसाद करणार आहेत. त्यामध्ये ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे. हे शिष्टमंडळं यूके, फ्रान्स, जर्मनी, इटली, डेन्मार्क आणि युरोपियन युनियनचा दौरा करून पाकिस्तानची पोलखोल करणार आहे.