Yusuf Pathan Delegation : पहलगाम येथील दहशतवादी हल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती सांगण्यात आली. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना करण्यात आली. यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या खासदारांचा समावेश करण्यात आला. हे शिष्टमंडळ विविध देशांत जाऊन भारताची बाजू मांडणार आहे. या खासदारांच्या शिष्टमंडळात पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार व माजी भारतीय क्रिकेटपटू युसुफ पठाण यांचं देखील नाव होतं. मात्र, त्यांनी या शिष्टमंडळाबरोबर जाणार नसल्याचा निर्णय घेतला. यावरून बरेच राजकारण झाले. युसुफ पठाण यांच्यावर चौहेबाजूने टीकेची झोड उठली. दरम्यान, यानंतर तृणमूल काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे.
शिष्टमंडळातून युसुफ पठाण यांचं नाव मागे घेतलं
बहरामपूरचे खासदार आणि भारताचे माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण यांचे शिष्टमंडळातून नाव वगळण्यात आलं आहे. त्यांच्या जागी तृणमूलने खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या नावाची शिफारस केली आहे. ज्याला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मान्यता दिली आहे. तृणमूल काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. “आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की, पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी दहशतवादाविरुद्ध भारताच्या जागतिक स्तरावरील प्रचारासाठी तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना नामांकित केले आहे,” असं तृणमूलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तृणमूल काँग्रेसने आपल्या निवेदनात पुढे म्हटलंय की, “जगाला दहशतवादाच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बाजू मांडण्यासाठी केंद्राने नियुक्त केलेल्या शिष्टमंडळात अभिषेक बॅनर्जी यांचा समावेश दृढनिश्चय आणि स्पष्टता दोन्ही आणतो. त्यांची उपस्थिती केवळ दहशतवादाविरुद्ध बंगालच्या ठाम भूमिकेचे प्रतिबिंबच नाही तर जागतिक स्तरावर भारताचा सामूहिक आवाज देखील बळकट करेल.”
आणखी वाचा : Maharashtra Politics : महायुतीमध्ये छगन भुजबळांचं महत्व का वाढलं?
शिष्टमंडळात कोणकोणत्या नेत्यांचा समावेश?
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी केंद्र सरकारने जगभरातील देशांतील राजधान्यांमध्ये सात शिष्टमंडळे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या शिष्टमंडळात विविध पक्षांचे ५१ राजकीय नेते, खासदार आणि माजी मंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान, शिष्टमंडळातील सदस्यांची निवड करण्यापूर्वी केंद्र सरकारने राजकीय पक्षांबरोबर सल्लामसलत केली नाही, अशी नाराजी तृणमूल काँग्रेसने बोलून दाखवली आहे. परराष्ट्र धोरण हा भारत सरकारचा विषय आहे. यांची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारनेच घेतली पाहिजे, असं म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने सुरुवातीला केंद्र सरकारच्या शिष्टमंडळापासून अंतर राखलं.
केंद्र सरकारने तृणमूल काँग्रेसशी संपर्क न करता थेट युसुफ पठाण यांच्याशी संपर्क साधला होता. शिष्टमंडळात त्यांच्या नावाचा समावेश करण्याची विनंती आमच्याकडे आली नाही. त्यामुळेच युसूफ पठाण यांनी केंद्राला नकार कळवला होता, असं तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र धोरणाबाबत आम्ही केंद्र सरकारबरोबर आहोत. “आमच्या पक्षाला सरकारला पूर्ण पाठिंबा आहे, असंही ममता बॅनर्जी यांनी पत्र देत आहोत,” असे ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं.
युसुफ पठाण यांच्यावर झाली होती टीका
दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनीही युसूफ पठाण यांची पाठराखण करताना केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. “राष्ट्रहितासाठी, दहशतवादाविरोधात लढण्यासाठी केंद्र सरकार जे निर्णय घेईल त्या निर्णयांचं आम्ही समर्थन करून. सरकार जी पावलं उचलेल त्यात आम्ही सरकारच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत. सरकारने शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतलाय त्या निर्णयावर अथवा सदस्य निवडीवर आमचा आक्षेप नाही. मात्र, आमच्या पक्षातून कोणाला पाठवायचं असेल तर तो निर्णय आमचा पक्ष घेईल. इतर पक्षांच्या लोकांनी असे निर्णय घेऊ नयेत. जर तुम्हाला एक सदस्य हवा असेल तर आम्ही पाच सदस्य देऊ शकतो – परंतु केंद्र सरकारने चांगला हेतू दाखवला पाहिजे,” असेही अभिषेक बॅनर्जी यांनी स्पष्ट केले होते.
हेही वाचा : Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचे निम्मे नगरसेवक शिंदे गटात; मुंबई महापालिकाही ताब्यातून जाणार?
दरम्यान, जनता दल युनायटेड पक्षाचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात युसूफ पठाण यांची निवड करण्यात आली होती. हे शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया प्रजासत्ताक, जपान आणि सिंगापूरला भेट देणार आहे. मात्र, भारताचे माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल पक्षाचे बहरामपूरचे खासदार युसूफ पठाण यांनी या शिष्टमंडळाबरोबर जाण्यास नकार दिला होता. यासंदर्भातील बातम्या प्रकाशित झाल्यानंतर पठाण यांच्यावर चौहेबाजूने टीकेची झोड उठली होती. तृणमूल काँग्रेसने युसुफ यांना असं कारण देण्यास सांगितलं असावं, असा सूर भाजपा नेत्यांमधून उमटू लागला होता.
युसुफ पठाण यांनी का दिला होता नकार?
ज्या काळात हे शिष्टमंडळ दौरे करणार आहे त्या काळात मी उपलब्ध नाही, असं पठाण यांनी स्पष्ट केलं होतं. तृणमूल काँग्रेसचे आणखी एक नेते सुदीप बंदोपाध्याय यांनी यापूर्वी सांगितले होते की, त्यांनाही या शिष्टमंडळात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, परंतु आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी नकार दिला. दरम्यान, यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने केंद्र सरकारला पत्र लिहून शिष्टमंडळातून खासदार युसूफ पठाण यांचं नाव मागे घेण्याची विनंती केली. त्यांच्याजागी मुख्यंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. जी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मान्य केली आहे. दरम्यान, केंद्राचे हे शिष्टमंडळ विविध देशात जाऊन पाकिस्तानचे कशी पोलखोल करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.