माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील निष्ठावंतांच्या गटाची सध्या अभूतपूर्व कोंडी झाली असताना, येत्या ५ मार्च रोजी कोकण दौऱ्याच्या निमित्ताने ठाकरे इथे नव्याने राजकीय फेरजुळणी करण्याच्या प्रयत्नात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दापोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश सोहोळा ५ मार्चला खेड येथील प्रसिद्ध गोळीबार मैदानावर ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणात या दौऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे.

हेही वाचा – आमदार प्रकाश आवाडे यांची भाजपाशी सलगी; प्रवेश कधी ?

गेल्या वर्षी जूनमध्ये ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये मोठी फूट पडून सत्तांतर घडून आले. त्यानंतर ठाकरे गटामध्ये अधूनमधून पडझड होत असतानाच गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार शिवसेना हे पक्षनाव आणि निवडणूक चिन्हही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मिळाल्याने मोठा धक्का बसला. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात तिच्या संदर्भात निर्माण झालेल्या विविध किचकट कायदेशीर मुद्द्यांवर जोरदार वाद प्रतिवाद चालू आहे. आपल्याला धोका दिलेल्या लोकांना अजिबात सोडू नका, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात पुण्यात भाजपा समर्थकांना दिला. त्यावरून भविष्यातही ठाकरे यांच्या संदर्भात भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचा काय रोख असणार, हे उघड होतं. या सर्व नाट्यमय राजकीय डाव-प्रतिडावांची पार्श्वभूमी ठाकरे यांच्या या दौऱ्याला लाभली आहे.

कोकण हा शिवसेनेचा गेली सुमारे तीस-पस्तीस वर्षं बालेकिल्ला राहिला आहे. त्यातही तळकोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांची पूर्वापार मुंबईशी नाळ जोडलेली असल्याने इथे नेहमीच ठाकरे गटाला पाठिंबा मिळत आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या गटाचं वर्चस्व अलीकडेपर्यंत अबाधित होतं. पण, गेल्या वर्षी रत्नागिरीचे मंत्री उदय सामंत, माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे आमदार चिरंजीव योगेश, हे‌ही शिंदे गटाला मिळाल्याने जिल्ह्याच्या दक्षिण आणि उत्तर, या दोन्ही भागांमध्ये या वर्चस्वाला सुरुंग लागला आहे. त्याचबरोबर, २००५ साली सध्याचे भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे बाहेर पडल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हादरा बसला. सुमारे दहा वर्षांच्या परिश्रमातून त्यावर मात करत ठाकरे गटाने तिथे पुन्हा आपली पकड बसवण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील तीनपैकी दोन आमदार या गटाचे होते. पण त्यापैकी दीपक केसरकरांनी दहा वर्षांत दुसऱ्यांदा रंग बदलल्याने आमदार वैभव नाईक यांना एकाकी लढत द्यावी लागत आहे.

हेही वाचा – Haryana: महिला प्रशिक्षकाचा भाजपाच्या मंत्र्यांवर छेडछाडीचा आरोप; मुख्यमंत्री खट्टर यांनी विरोधकांची राजीनाम्याची मागणी धुडकावली

या पार्श्वभूमीवर कदम पिता-पुत्रांचं घरचं मैदान असलेल्या खेडमध्ये मेळावा घेऊन ठाकरे कोकणात नव्याने राजकीय फेरजुळणी करू पाहत आहेत. आक्रमक शैलीचे माजी आमदार संजय कदम यांच्या रुपाने कदम पिता-पुत्रांच्या परंपरागत राजकीय विरोधकांनी त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्यांच्या माध्यमातून या तालुक्यातील रामदासभाई यांच्या राजकीय वर्चस्वाला शह देण्याची खेळी उघडपणे दिसत आहे. त्याचबरोबर, निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये असलेली संभ्रमावस्था आणि अस्वस्थता दूर‌ करून नवं बळ देण्याचा प्रयत्न या निमित्ताने ठाकरे स्वाभाविकपणे करणार आहेत. शेजारच्या गुहागर तालुक्यातील आक्रमक ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव यांची असलेली साथ त्या दृष्टीने महत्त्वाची आहे. कारण कोकणचा हा गड शाबूत राखणे ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीने मुंबईइतकंच महत्त्वाचं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray new political makeover on the occasion of konkan tour print politics news ssb