Uddhav Thackeray-Raj Thackeray Mumbai Morcha : जवळपास दोन दशकांपासून विभक्त असलेले ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे व राज ठाकरे) लवकरच एकत्रित दिसणार आहेत. पहिलीपासून हिंदी शिकविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात दोघेही मुंबईत ५ जुलैला संयुक्त मोर्चा काढणार आहेत. महायुती सरकारच्या हिंदीच्या निर्णयामुळे राज आणि उद्धव यांना मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी एकत्रित येण्याचं कारण मिळालं आहे. विशेष बाब म्हणजे, या मोर्चाचं नेतृत्व कुणीही करणार नसून त्यात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल, असं मनसे व ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी ही घडामोड अतिशय महत्वाची मानली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित येणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तसे संकेतही दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून वारंवार देण्यात आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना व मनसे यांच्यात युती झाल्यास ते सत्ताधाऱ्यांना कडवी झुंज देऊ शकतात, असं काहींचं म्हणणं आहे. त्याचबरोबर एकसंध शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेतही दोन्ही पक्षांना मोठं यश मिळू शकतं असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी बांधला आहे. मनसे व शिवसेना यांच्यातील युती ठाकरे बंधूंना बळकटी देणारी ठरू शकते, असंही ते सांगत आहेत.

हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू आक्रमक

  • राज्य सरकारच्या हिंदीच्या मुद्द्याविरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली.
  • गुरुवारी शिवसेना ठाकरे गट व मनसेकडून दोन वेगवेगळ्या मोर्चांची घोषणा करण्यात आली होती.
  • राज ठाकरे यांनी ६ जुलैला गिरगाव चौपाटीवर विराट मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते.
  • तर उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या दिवशी ७ जुलैला आजाद मैदानातील आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा केली.
  • मात्र, त्यानंतर काही तासांतच मनसे व शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील नेत्यांमध्ये संवाद सुरू झाला.
  • राज ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना एकत्र मोर्चा काढण्याचा प्रस्ताव दिला.
  • संजय राऊत यांनी राज यांचा हा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवला.
  • मनसे प्रमुखांच्या या प्रस्तावावर शिवसेना प्रमुखांनी तत्काळ सहमती दर्शवली, अशी माहिती राऊतांनी माध्यमांना दिली.

आणखी वाचा : Maharashtra Politics : शरद पवारांचा सहकार क्षेत्रातील प्रभाव कसा कमी झाला?

खासदार संजय राऊत काय म्हणाले?

शुक्रवारी पहाटे संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून ठाकरे बंधूंचा एकत्रित फोटो शेअर करीत एक पोस्ट केली. “महाराष्ट्रातील शाळांमध्ये सक्तीची हिंदी लादण्याविरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघणार आहे. ठाकरे हा ब्रँड आहे,” असं राऊतांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं. राज आणि उद्धव यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य नेते होते, ज्यातून पुढे महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये वेगळी झाली. मुंबई ही फक्त महाराष्ट्राचीच आहे अशी मागणी त्यांनी जोरकसपणे लावून धरली होती.

उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र (छायाचित्र संजय राऊत सोशल मीडिया)

राज-उद्धव यांच्यातील मतभेद कशामुळे?

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा उभारण्याच्या उद्देशाने १९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. प्रबोधनकार ठाकरे यांच्या खोलीत अवघ्या १८ जणांच्या साक्षीने शिवसेनेची स्थापना झाली होती. २००६ मध्ये राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. शिवसेनेत जेवढे अधिकार उद्धव ठाकरे यांना दिलेले आहेत, तेवढेच मलाही हवे असं राज यांनी त्यावेळी बाळासाहेबांना म्हटलं होतं, असं राजकीय विश्लेषक सांगतात. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरही राज यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा अत्यंत जोरकसपणे लावून धरला. मात्र, शिवसेना व मनसेची विचारधारा एकच असूनही उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात नेहमीच मतभेद राहिले आहेत.

ठाकरे बंधू निवडणुकीतही एकत्रित येणार?

यापूर्वीही राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्रित येण्याबाबत अनेकदा चर्चा झाल्या. मात्र, मनसेच्या सूत्रांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यासाठी फारसा उत्साह दिसला नव्हता. मात्र आता दोघेही एकत्र येण्यास तयार झाल्याने, त्यांच्या नात्यातील तणाव कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. एप्रिल २०२५ मध्ये राज्य सरकारने एक शासकीय आदेश जारी केला, ज्यात इयत्ता पहिल्यापासून तीन भाषा शिकवण्यात येणार असून त्यातील हिंदी तिसरी अनिवार्य भाषा असेल असं नमूद करण्यात आलं होतं. या निर्णयाला मोठा विरोध झाल्यानंतर सरकारने तो आदेश मागे घेतला.

हेही वाचा : गुजरातमध्ये काँग्रेस पुन्हा अपयशी; पोटनिवडणुकीनंतर कोणकोणते प्रश्न आले ऐरणीवर?

मनसे नेते संदीप देशपांडे काय म्हणाले?

जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्य सरकारने पुन्हा एक नवीन शासन निर्णय जाहीर केला, ज्यामध्ये हिंदी अनिवार्य हा शब्द वगळण्यात आला. मात्र, हिंदीच्या पर्यायांना दिलेल्या बंधनात्मक अटींमुळे अनेकजण याला हिंदी सक्तीच म्हणत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सर्वात आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले की, राज ठाकरे हा तीन भाषांच्या फॉर्म्युल्याविरोधातील आंदोलन पुढे नेणार आहेत. “मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आम्ही हा मोर्चा काढणार आहोत… हा राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचा वैयक्तिक मोर्चा नाही, तर हा प्रत्येक मराठी माणसाचा आवाज आहे. ५ जुलैचा मोर्चा महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडवून आणेल,” असं देशपांडे यांनी स्पष्ट केलं.