वर्धा : नगर पालिका निवडणुकीत महायुती विरुद्ध विखूरलेली आघाडी असे प्राथमिक टप्प्यातील चित्र दिसून येते. मावळत्या कार्यकाळात जिल्ह्यातील सहाही पालिकेवर भाजपचे एकहाती साम्राज्य होते. हे यश तसेच कायम राखण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार हे एकच बडे लोकप्रतिनिधी आहेत. तर भाजपतर्फे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर तसेच आमदार सुमित वानखेडे, समीर कुणावार व राजेश बकाने आणि विधान परिषदेचे आमदार दादाराव केचे अशी नेत्यांची फौज आहे. दिमतीस माजी खासदार रामदास तडस व सुरेश वाघमारे ही जोडी. त्यामुळे प्रथमदर्शनी सामना एकतर्फी दिसतो. पण तरीही १०० टक्के यश कायम राखणार का, याची हमी युतीचे नेते देवू शकत नाही.
महायुती नाहीच
मित्र पक्ष शिंदे सेना व राष्ट्रवादी अजित पवार यांना सोबत घेण्याची गरज नाही, असा आत्मविश्वास बाळगून युतीचे कर्तेधर्ते वाटचाल करीत आहे. शिंदे सेनेचे रविकांत बालपांडे यांना तसा स्पष्ट निरोप मिळाल्याने ते स्वतः सर्व तयारीनीशी लढतीत निवडणुकीत उतरणार आहे तर अजित पवार गट अद्याप दखलपात्र अवस्थेत नाही.
आघाडीत काळे यांचे प्रभुत्व
दुसरीकडे आघाडीत राष्ट्रवादी खासदार अमर काळे यांचे प्रभुत्व असल्याने ठाकरे सेना व काँग्रेस दुय्यम स्थानी गेल्याचे पाहायला मिळते. खुद्द खासदार विरोधात त्यांच्याच पक्षाचा सहकार गट जाहीर नाराजी ठेवून आहे. या पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांना बाजूला सारून समीर देशमुख यांनी काँग्रेस सोबत मैत्रीचा हात पुढे केला. ही बाब उजेडात आली आणि भेद चव्हाट्यावर आले.
मित्रपक्षांची फरफट
भाजप व काँग्रेस यांचे मित्रपक्ष आज तरी काय करायचे हेच चाचपडत आहे. यात भाजप सर्वशक्तिशाली म्हणून आज तरी एकमेव आहे. नगराध्यक्षपदाचे तर सोडाच साध्या नगरसेवकांच्या जागा द्यायला मित्रपक्षांस भाजप चक्क नकार देत आहे. त्यामुळे युतीचे तीन पक्ष स्वतंत्र लढणार. विरोधात काँग्रेस आघाडी अशी पहिल्या टप्प्यातील वाटचाल म्हणता येईल. उमेदवारी हा आघाडीसाठी कळीचा मुद्दा आहे. काँग्रेसचा संभाव्य प्रबळ दावेदार सुधीर पांगुळ हे आम्हास चालत नाही, अशी सहकार गटाची स्पष्ट भूमिका आहे. म्हणून शेखर शेंडे गट वर्धा पालिकेत वेगळी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
आर्वी पालिका
आर्वीत भाजप आमदार सुमित वानखेडे व दादाराव केचे यांचे छुपे वैर लपून नाही. त्यातच केचे यांनी आपल्या सुनबाईस नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून पुढे केले. त्यास वानखेडे गटाचा विरोध राहणार. या वादात नवेच नाव पुढे येणार.
हिंगणघाट पालिका
हिंगणघाट पालिकेत आमदार कुणावार म्हणेल तेच ठरेल. ईथे अजित पवार गट व शिंदे गट सोबत घेऊन लढण्याची तयारी सूरू आहे. काँग्रेसमध्ये तर शुकशुकाट आणि ठाकरे व शरद पवार काँग्रेस अधांतरी.
देवळी पालिका
देवळीत माजी खासदार तडस व आमदार राजेश बकाने हेच निर्णय घेणार. त्यात तडस यांनी त्यांच्या अर्धांगिनी व माजी नगराध्यक्ष शोभा तडस यांची उमेदवारी रेटल्याने आमदार बकाने काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देवळी व पुलगाव या दोन पालिकेत काँग्रेस टक्कर देण्याची चिन्हे आहेत. कारण माजी आमदार रणजित कांबळे यांचे अस्तित्व पणाला आहे. विधानसभेतील पराभवाच्या जखमा काँग्रेससाठी अद्याप ताज्या आहेत. त्यातच या पालिका निवडणुका लागल्या. देवळी व पुलगाव पालिकेत विजय मिळवून काँग्रेस अस्तित्व दाखविण्याचे आव्हान कांबळे यांच्यावर आहे.
चारही मतदारसंघात असलेले भाजप आमदार ही निवडणूक इरेला पेटून लढण्याच्या तयारीत आहे. सत्ता, संपत्ती, साधने यात बलदंड दिसणाऱ्या भाजप विरोधात अपवाद वगळता दिव्यांग वाटणारी आघाडी, असा हा सामना आहे. पण तरीही लोकांचा कौल मिळालाच हवा, असा वरिष्ठ पातळीवरून रेटा असल्याने खरे आव्हान भाजप पुढेच असल्याची स्थिती दिसून येते.
