Lalu Prasad Yadav IRCTC scam case : बिहारमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. त्याआधी राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कायदेशीर अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कथित आयआरसीटीसी घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने सोमवारी (१३ ऑक्टोबर) लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर फसवणूक, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप निश्चित केले आहेत. यादव कुटुंबीयांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले असून कायदेशीर खटल्याला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे. नेमके काय आहे आयआरसीटीसी घोटाळा प्रकरण? त्या संदर्भातील हा आढावा…

बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या प्रचाराला वेग दिला आहे. या निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभूत करण्यासाठी लालू प्रसाद यादव यांनी महाआघाडीची मोट बांधली आहे. बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. यादरम्यान आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणातील आरोपांची निश्चिती झाल्यामुळे लालू यादव यांचे पाय खोलात गेले आहेत.

आयआरसीटीसी घोटाळा नेमका काय आहे?

२००४ ते २००९ या काळात केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीचे (काँग्रेसप्रणीत यूपीए) सरकार होते. या सरकारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्याकडे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी होती. त्यांच्या कार्यकाळात आयआरसीटीसीच्या रांची आणि पुरी येथील दोन हॉटेल्सच्या देखभाल करारामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या आरोप सीबीआयने केला आहे. सुझाता हॉटेल्स या कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी पात्रतेच्या अटी बदलण्यात आल्या आणि त्या मोबदल्यात लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांना पाटणा येथील तीन एकर मोक्याची जागा अत्यल्प किमतीत हस्तांतरित करण्यात आली, असे सीबीआयने आपल्या आरोपपत्रांत म्हटले आहे.

आणखी वाचा : Shiv Sena-MNS Alliance : मुंबईतील २२७ पैकी ‘इतक्या’ प्रभागांमध्ये मनसेचा दरारा; ठाकरे बंधूंची युती झाल्यास कुणाला फटका?

पाटण्यातील ही जमीन कोट्यवधी रुपयांची असून ती लालू प्रसाद यांच्या पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांच्याशी संबंधित कंपनीच्या नावावर असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. या आरोपपत्रामध्ये आयआरसीटीसीचे तत्कालीन समूह महाव्यवस्थापक व्ही.के. अरोरा, आर. के गोयल यांच्यासह सुजाता हॉटेल्सचे संचालक विजय आणि विनय कोचर यांच्या नावांचाही समावेश आहे. या फौजदारी खटल्याच्या सुनावणीला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याचे दिल्लीतील न्यायालयाने सांगितले आहे.

न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवले?

दिल्लीतील विशेष न्यायालयाने सोमवारी लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर फसवणूक, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप निश्चित केले. रेल्वेमंत्री असताना लालू यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून निविदा प्रक्रिया प्रभावित केली. त्याचबरोबर पात्रतेच्या अटी बदलून विशिष्ट हॉटेल कंपनीला फायदा करून दिला, असे निरीक्षण न्यायाधीश विशाल गोगने यांनी नोंदवले. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, लालू यादव यांच्यावर भ्रष्टाचार, गुन्हेगारी कट आणि फसवणूक या आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यावर कट रचणे आणि फसवणूक अशा अनेक गुन्ह्यांचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

लालू यादव यांनी फेटाळले सर्व आरोप

विशेष न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, माजी रेल्वे मंत्री लालू यादव यांनी निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप केला होता आणि त्यात मोठे बदल घडवून आणले होते. हा सर्व प्रकार सरकारी पदाचा दुरुपयोग करून करण्यात आला. या घोटाळ्याच्या मोबदल्यात मिळालेली जमीन राबडी आणि तेजस्वी यादव यांच्या नावावर करण्यात आली. दरम्यान, न्यायालयाने या आरोपांबाबत विचारले असता, लालू प्रसाद यादव यांच्यासह सर्व आरोपींनी आरोप फेटाळून लावले. बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक असल्याने आमच्या विरोधात राजकीय हेतूने खटला चालवला जात असल्याची प्रतिक्रिया तेजस्वी यादव यांनी दिली.

हेही वाचा : Top Political News : शिंदेंच्या योजनांना फडणवीसांचा ब्रेक? पंकजा मुंडेंच्या अडचणी वाढणार? काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ महत्वाच्या घडामोडी…

भाजपाची लालू प्रसाद यांच्यावर टीका

आरोप निश्चित झाल्यामुळे आता लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबाला या कथित आयआरसीटीसी घोटाळ्याप्रकरणी कायदेशीर खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. आरोप सिद्ध झाल्यास त्यांना कारावास, दंड आणि सार्वजनिक पदावरून अपात्र ठरवले जाऊ शकते, असे मत कायदे तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भाजपाने याच मुद्द्याला हाताशी धरून राष्ट्रीय जनता दल पक्षावर टीकेचा भडिमार केला आहे. घोटाळे करणे, जनतेची फसवणूक करणे हेच लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांचे प्रारूप आहे, अशी टीका भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी दिल्ली येथील पत्रकार परिषदेतून केली आहे.

महाआघाडीत जागावाटपावरून तणाव

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण घडले आहे. सध्या लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. आरजेडीने काँग्रेसला ५२ जागा सोडण्याचा प्रस्ताव दिला असला तरी ६० जागा लढवण्यावर काँग्रेस ठाम आहे. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी जागावाटपासंदर्भातील चर्चा थांबवली असून, आज दिल्लीत पक्षाच्या निवड समितीची बैठक होणार आहे. लालू यादव आणि तेजस्वी यादव हे आधीच दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यामुळे महाआघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटणार की आणखी पेच निर्माण होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.