Bjp’s New President रविवारी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत इतिहास रचला. त्यांच्यासोबत आणखी ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली. रविवारी (९ जून) शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी (१० जून) मोदी सरकारच्या तिसर्‍या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात यंदा चार वर्षांहून अधिक काळ भाजपाचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व करणार्‍या जे. पी. नड्डा यांच्या नावाचाही समावेश आहे. आता नड्डा मंत्रिमंडळात परत आल्याने भाजपाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपा अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोणत्या नेत्यांच्या नावाचा समावेश आहे? यावर एक नजर टाकू या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपामध्ये सत्ताबदल होण्याची शक्यता?

रविवारी (९ जून) भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. भाजपाने ‘एक व्यक्ती, एक पद’ या धोरणाचा अवलंब केल्याने आता पक्षाला नवीन अध्यक्षांचा शोध घ्यावा लागणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून पक्षाचे दिग्गज नेते नड्डा यांनी भाजपा अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. २०२० पासून ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. या वर्षी जानेवारीत त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असून, आता त्यांचा कार्यकाळ जूनमध्ये पूर्ण होणार आहे.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात नड्डांची वापसी; अभाविप कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री, जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

भाजपा अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण कोण?

मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून नड्डा यांनी शपथ घेतल्यानंतर पक्षाचे नेतृत्व कोण करणार यावरून प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे पक्षाध्यक्षपदासाठी आधीच नावांची चर्चा सुरू झाली होती; ज्यात एम. एल. खट्टर, शिवराज सिंह चौहान यांच्या नावांचा समावेश होता. परंतु, त्यांनीही मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे आता हा पदभार नक्की कोण सांभाळणार, याची चर्चा सुरू आहे.

आता भाजपा अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले एक नाव म्हणजे माजी मंत्री अनुराग ठाकूर. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर मतदारसंघातून पाचव्यांदा विजयी होऊनही त्यांना मंत्रिमंडळात कोणतीही जागा देण्यात आलेली नाही. अनुराग ठाकुर भाजपाच्या युवा शाखेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे त्यांना संघटनेचा अनुभव आहे. “भारताला विकसित राष्ट्र करण्याचे मोदींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कठोर परिश्रम करीत राहीन,” असे त्यांनी रविवारी (९ जून) माध्यमांशी बोलताना सांगितले. नड्डा मूळ हिमाचल प्रदेशमधील आहेत; तर ठाकूरदेखील हिमाचल प्रदेशमधील आहेत. त्यामुळे भाजपाने ठाकूर यांची निवड केल्यास पक्षाचे सर्वोच्च पद दुसर्‍यांदा एकाच राज्यातील नेत्याला मिळेल.

चर्चेत असलेले आणखी एक नाव म्हणजे विनोद तावडे. मूळचे महाराष्ट्राचे असलेले तावडे राज्य स्तरावर मंत्री राहिले आहेत. सध्या ते बिहारचे प्रभारी सरचिटणीस आहेत. लोकसभा प्रचारादरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)ची पार्श्वभूमी असलेले तावडे आपल्या मृदुभाषी वक्तृत्व शैलीसाठी ओळखले जातात. भाजपाने त्यांना हा पदभार दिल्यास या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी चांगला संदेश जाईल. राष्ट्रीय निवडणुकीत पक्षाचे राज्यातील खराब प्रदर्शन लक्षात घेता, हा निर्णय फायदेशीर ठरू शकतो.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रचारक सुनील बन्सल यांचेही नाव अध्यक्षपदासाठी पुढे येत आहे. सुनील बन्सल हे गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे मानले जातात. त्याशिवाय त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तात असे म्हटले आहे की, लोकसभा प्रचारादरम्यान बन्सल यांनी देशभरातील सर्व कॉल सेंटर हाताळले, प्रतिक्रिया गोळा केल्या आणि मैदानात उतरून काम करणार्‍या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा दिली.

भाजपाकडे असलेल्या अनेक पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे बी. एल. संतोष हे आहेत. पक्षाचे सरचिटणीस (संघटना) म्हणून काम करीत असलेले बी. एल. संतोष यांना भाजपाची संघटना आणि त्यांच्या कार्यपद्धतीची चोख माहिती आहे. परंतु, त्यांची प्रमुखपदी निवड करण्यात एक अडचण आहे. कर्नाटक भाजपाचा एक गट २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवासाठी त्यांना जबाबदार धरतो.

भाजपा अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले आणखी एक नाव आहे. राजस्थानमधील ओम माथूर यांचे. खरे तर माथूर हे पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय मानले जातात. ओम माथूर हे मोदी यांच्यासह अमित शहांचेदेखील खास मानले जातात. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना माथूर हे गुजराजतचे प्रभारी होते.

हेही वाचा : निवडणुकीतील अपयशानंतर पश्चिम बंगाल भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कारण काय?

या स्पर्धेत आणखी कोण असू शकते?

या नावांशिवाय भाजपाच्या अध्यक्षपदासाठी आणखीही काही दावेदार आहेत. त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे. राज्यातील भाजपाच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत, त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र, आता त्यांनी राजीनामा मागे घेतला आहे. भाजपाच्या अंतर्गत सूत्राने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला सांगितले, नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी संघाचे मत विचारात घेतले जाईल. आता भाजपाच्या नवीन अध्यक्षपदी नक्की कोणाची नियुक्ती केली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is in the race to replace jp nadda as bjp president rac