Latest News on Maharashtra Politics Today : योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी केली, तर महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला. मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर मंत्री छगन भुजबळ संतापल्याचे पाहायला मिळाले. नवी मुंबई विमानतळाला मोदींचं नाव दिले जाणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला, तर शरद पवार हे पापाचे धनी असल्याची टीका मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली. महाराष्ट्रातील या पाच महत्वाच्या राजकीय घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

मंत्री योगेश कदम यांच्या हकालपट्टीची मागणी

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रामदास कदम यांचे पुत्र मंत्री योगेश कदम यांना एका प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं घेरलं आहे. त्यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करण्याची मागणीही ठाकरे गटाने केली आहे. जोपर्यंत त्यांना हटवले जात नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी महायुती सरकारला दिला आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुंबईत जाहीर पत्रकार परिषद घेतली.

“गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुंड निलेश घायवळ यांचा भावाला अधिकृत शस्त्र परवाना दिला. पोलिसांनी हा परवाना नाकारला होता; पण योगेश कदमांनी पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश रद्द केले. पोलिसांच्या रिपोर्टमध्ये आरोपीची सगळी पार्श्वभूमी लिहिली आहे. तरीही योगेश कदमांनी कुठल्या मोबदल्यात त्याला शस्त्र परवाना मिळवून दिला?”, असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

आणखी वाचा : बिहारमध्ये पुन्हा NDA सत्तेत आल्यास मुख्यमंत्री कोण? भाजपा नेत्याचा मोठा दावा, नितीश कुमारांबद्दल काय म्हणाले?

रोहित पवार यांचा महायुतीवर फसवणुकीचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला. “निवडणुकीपूर्वी या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असा शब्द दिला होता, पण अजूनही कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही. शेतकरी जर अडचणीत असेल, तर त्याला मदत करायला हवीच. शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देऊन सरकारने त्यांची फसवणूक केली आहे. नुकसानभरपाईचे आकडे फुगवून दाखवले जात आहेत आणि ही सगळी दिखाऊ घोषणा केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे,” असा आरोप रोहित पवार यांनी केला. “शेतमजुरांना पुढील सहा महिन्यांचा उदरनिर्वाहासाठी प्रत्येकी २६ हजार रुपये देण्यात यावेत. सरकार म्हणते ६५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले, त्यासाठी केंद्राकडून एनडीआरएफमार्फत ६,१७५ कोटी मिळतील, आणि राज्याकडून ६,५०० कोटी देणार. पण प्रत्यक्ष मदतीचा परिणाम शून्य आहे,” असेही आमदार पवार म्हणाले.

मनोज जरांगेंच्या वक्तव्यावर भुजबळांचा संताप

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी (तारीख ८ ऑक्टोबर) माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली होती. अजित पवार यांनी आपल्या पक्षात साप पाळले आहेत, असा घणाघात जरांगे यांनी केला होता. त्यांच्या या टीकेचा मंत्री छगन भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. “मनोज जरांगेंच्या कुणीही मागे लागू नये, त्याला काहीच काम धंदा नाही. त्याचे शिक्षण किती झाले याचीही माहिती नाही”, असे म्हणत भुजबळांनी संताप व्यक्त केला. “मला बाळासाहेब ठाकरेंनी नेता केले आहे. मी मुंबईचा दोनदा महापौर झालो. मंडल आयोगामुळे मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. जरांगेला राजकारणात कोण कधी आले ते तरी माहीत आहे का? त्याच्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा कशी करू शकता?”, असा सवालही भुजबळांनी उपस्थित केला.

नवी मुंबई विमानतळाला मोदींचे नाव दिले जाणार, राऊतांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. मात्र अद्याप या विमानतळाला कोणतेही नाव देण्यात आलेले नाही. दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला मिळावे, यासाठी गेली तीन वर्षे पनवेल आणि उरण परिसरातील स्थानिक आंदोलन करत आहेत. यापार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोठा दावा केला. नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यास गौतम अदाणी यांचा विरोध असल्याचे संजय राऊत म्हणाले. ‘नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव नवी मुंबईच्या विमानतळाला देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. गौतम अदाणी विरोध असल्यामुळेच नवी मुंबईच्या विमानतळास दिबा पाटील यांचे नाव मिळू शकले नाही, असा आरोपही राऊत यांनी केला.

हेही वाचा : भाजपाच्या ‘मिशन बिहार’ला निवडणुकीपूर्वीच धक्का? दोन मित्रपक्ष साथ सोडणार असल्याची चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण!

शरद पवार पापाचे धनी, मंत्री विखेंची टीका.

महायुती सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज बुलढाणा दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. या दोन्ही समाजात आज जो संघर्ष निर्माण झाला, त्याला शरद पवार हेच जबाबदार असल्याची टीका विखे यांनी केली. या सर्व पापाला शरद पवार हेच कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. “१९९४ मध्ये जर पवार साहेबांनी मराठा समाजाचा विचार केला असता तर आज अशी परिस्थिती नसती. मला ओबीसी बांधवांना हा प्रश्न विचारायचा आहे की, तुम्हाला आरक्षण देताना मराठा बांधवांनी कधी विरोध केला होता का?”, असा प्रश्नही विखे यांनी यावेळी उपस्थित केला. मराठा आरक्षणाच्या जीआरवरून सध्या ओबीसी समाज आक्रमक झाला असून उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.