पुणे : राज्य मंडळातर्फे राज्यात दहावीची परीक्षा शुक्रवारी सुरळीत सुरू झाली. पहिल्याच दिवशी भाषा विषयांची परीक्षा असूनही राज्यभरात आठ गैरमार्ग प्रकरणांची नोंद झाली असून, लातूर आणि जळगाव येथे परीक्षा केंद्रावर बाहेरून कॉपी पुरवण्याच्या प्रकाराबाबत राज्य मंडळाने अहवाल मागवला आहे.

यंदा दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी १६ लाख नऊ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थीसंख्येत वाढ झाली आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाने २७१ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच जिल्हा स्तरावरही भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. परीक्षेच्या पहिल्या दिवशी भाषा विषयाची परीक्षा झाली. त्यात पुणे विभागात दोन, नागपूर विभागात तीन, नाशिक विभागात दोन, तर लातूर विभागात एक अशी एकूण आठ गैरमार्ग प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

हेही वाचा – बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका

हेही वाचा – रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे – लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द, काही उशिराने धावणार

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की दहावीची परीक्षा राज्यभरात सुरळीत सुरू झाली. पहिल्या दिवशी आठ गैरमार्ग प्रकरणांची नोंद झाली. तसेच जळगाव आणि लातूर येथील परीक्षा केंद्रावर बाहेरून कॉपी पुरवण्यात येत असल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. त्याबाबत अहवाल मागवण्यात आला आहे.