पुणे : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सर्वदूर होत असलेल्या जोरदार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या मुुंबई-पुणे लोहमार्गावर पाणी साठल्याने दोन्ही शहरांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील १४ गाड्यांच्या फेऱ्या बुधवारपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई-पुणे-सोलापूर दरम्यान धावणारी ‘वंदे भारत एक्सप्रेस’ आणि डेक्कन क्वीन या गाड्यांची सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या गाड्यांतून रोज ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फटका बसला आहे.
दौंड सुपरफास्ट एक्सप्रेस आणि जोधपूर एक्सप्रेसचे मार्ग बदलण्यात आले आहे. नागरकोयल, कोयना आणि उद्यान एक्सप्रेस पुणे रेल्वे स्थानकावरच थांबविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रसासनाकडून मंगळवारी देण्यात आली. गाड्या अचानक रद्द झाल्याने आणि मार्गस्थ गाड्या अडकून पडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
रद्द करण्यात आलेल्या १४ गाड्या
मध्य रेल्वेने १९ ऑगस्ट रोजी मुंबईवरून पुणे स्थानकावर आणि पुढे मार्गस्थ होणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज (२० ऑगस्ट) या गाड्या पुणे स्थानकावरून धावणार नसल्याचे मध्य रेल्वे विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस, दख्खन एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस यांचाही समावेश आहे.
पुणे स्थानकावरून उशिरा सोडण्यात आलेल्या गाड्या
मुंबई-नागरकोईल (१६३३९) ही गाडी पुणे स्थानकावरून रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटेल. त्याचबरोबर मुंबई-हुबळी (१११३९) ही गाडी पुणे स्थानकावरून मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटेल, तर मुंबई-सोलापूर (१२११५) ही गाडी बुधवारी पहाटे २ वाजून २० मिनिटांनी सुटेल, असे मध्य रेल्वेकडून स्पष्टीकरण देण्यात आले.
पुण्यातच बुधवारी (२० ऑगस्ट) थांबणाऱ्या गाड्या
१६३४० – नागरकोईल-मुंबई-नागरकोईल एक्सप्रेस
११०३० – कोल्हापूर-मुंबई-कोयना एक्सप्रेस
११३०२ – बंगळुरू-मुंबई -उद्यान एक्सप्रेस
मार्ग बदललेल्या गाड्या
दौंड-इंदूर (२२९४३) दरम्यान धावणारी दौंड सुपरफास्ट एक्सप्रेस मनमाड-जालना-पुलद्रा-सुरतमार्गे धावेल.
बेंगळुरू-जोधपूरदरम्यान (१६५०८) धावणारी जोधपूर एक्सप्रेस पुणे-दौंड-मनमाड-जालना-पुलद्रा-सुरतमार्गे धावेल.
प्रवाशांचे हाल
जोरदार पावसामुळे गाड्या रद्द करण्याची नामुष्की रेल्वे प्रशासनावर आली आहे. परंतु, अचानक बदलामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक प्रवासी पर्यायी वाहतूक साधनांचा शोध घेत आहेत. रेल्वेने प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन करताना नवीन वेळापत्रक तपासण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे प्रशासनाने सुचवले असून, प्रवाशांना तक्रार किंवा माहितीसाठी रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांक १३९ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.