पिंपरी-चिंचवड : प्रेमप्रकरणातून आयटी हब असलेल्या हिंजवडी येथे एका १८ वर्षीय मुलीवर चॉपरने हल्ला करण्यात आला. दुपारी सव्वाचार च्या सुमारास घडलेल्या या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी प्रियकर योगेश भालेराव, प्रेम लक्ष्मण वाघमारे आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ वर्षीय तरुणी आणि आरोपी योगेश यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. योगेश विवाहित आहे आणि त्याच्या पत्नीला त्यांचे नाते कळल्यानंतर ती त्याला सोडून गेली. लग्नाबाबत १८ वर्षीय तरुणीकडे आरोपीने तगादा लावला.
प्रेयसीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचं समजलं. ज्यामुळे योगेश संतप्त झाला. आज दुपारी सव्वाचार च्या सुमारास, हिंजवडीतील साखरे वस्ती येथे योगेशने दोन मित्रांसह प्रेयसीवर चॉपरने हल्ला केला. तिच्यावर चॉपरने सपासप वार केले. तिच्या हाताला, तोंडाला आणि इतर भागात दुखापत झाली आहे. मुलीला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तिची प्रकृती स्थिर आहे. हिंजवडी पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेतलं आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त कुऱ्हाडे आणि पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी माहिती दिली आहे.
