पुणे : ‘काळ्या पैसे व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, या प्रकरणात अटक करण्यात येणार आहे’, अशी भीती दाखवून सायबर चोरट्यांनी डेक्कन जिमखाना भागातील एका ८८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे डेक्कन जिमखाना भागात राहायला आहेत. ९ जुलै रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ‘गोयल नावाच्या एका व्यक्तीने ५३८ कोटी रूपयांचा गैरव्यवहार केला आहे. त्याने तुमचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड वापरले आहे. आम्हाला तुमच्या बँकखात्याची तपासणी करायची आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तुम्हाला अटक करण्यात येईल’, अशी भीती दाखवून सायबर चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी १९ लाख ८० हजार रुपये जमा केले.सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केली. संशय आल्याने त्यांनी चौकशी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत तपास करत आहेत.

गुंतवणुकीच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका तरुणाची नऊ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार तरुण लोहगाव भागात राहायला आहे. चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. सुरुवातीला तरुणाने थोडी रक्कम चोरट्याच्या खात्यात जमा केली. या रक्कमेवर परताव मिळाल्याचे भासविले. प्रत्यक्षात चोरट्यांनी त्याला परतावा दिला नाही. त्यानंतर तरुणाने आणखी रक्कम गुंतवले. तरुणाला परतावा, तसेच मूळ मुद्दल न दिल्याने त्याने नुकतीच तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव तपास करत आहेत.

तरुणीची पाच लाखांची फसवणूक

घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून हडपसर भागातील एका तरुणीची सायबर चोरट्यांनी पाच लाख नऊ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी हडपसर भागताील विठ्ठलनगर परिसरात राहायला आहे. १६ सप्टेंबर रोजी सायबर चोरट्यांनी तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर साधला होता. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगले पैसे मिळतात, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. या कामात पैसे गुंतविल्यास परताव्याची रक्कम वाढेल, असे सांगून चोरट्यंनी तरुणीला जाळ्यात ओढले. तरुणीने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. त्यानंतर तिला परतावा दिला नाही. तरुणीने नुकतीच पोलिसंकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करत आहेत.