पुणे : राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) एकाच दिवसात ९ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ११० वर पोहोचली आहे. सध्या १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे परिसरात रुग्णांच्या संख्येतील वाढ लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उच्चस्तरीय पथक नेमले आहे. हे पथक सार्वजनिक आरोग्य उपाययोजना आणि व्यवस्थापनात राज्याच्या आरोग्य विभागाला मदत करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील एकूण रुग्णांपैकी ७३ पुरुष आणि ३७ महिला आहेत. सर्वाधिक रुग्ण पुणे परिसरात असून, त्यात पुणे महापालिका परिसरात ८८, पिंपरी-चिंचवड महापालिका भागात १५ आणि जिल्ह्यात इतर ठिकाणी सात रुग्ण आहेत. केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (दिल्ली), निम्हान्स (बंगळुरू), पुण्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्था (एनआयव्ही) या संस्थांमधील सात तज्ज्ञांचा समावेश आहे. ‘एनआयव्ही’चे तीन तज्ज्ञ आधीच स्थानिक प्रशासनाला मदत करीत असून, आता केंद्रीय पथकही दाखल झाले आहे. हे पथक राज्याच्या आरोग्य विभागांबरोबर एकत्रितपणे काम करील, प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेईल आणि आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांची शिफारस करील. केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि राज्याबरोबर समन्वय साधून सक्रिय पावले उचलण्यात येत आहेत. रुग्णांचे शौच, रक्त आणि लघवी नमुने आरोग्य विभागातर्फे तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात येत आहेत. ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आलेल्या २३ रक्त नमुन्यांमध्ये डेंग्यू, चिकुनगुन्या आणि झिका संसर्ग आढळून आलेला नाही. ‘एनआयव्ही’कडे ७३ रुग्णांचे शौचनमुने पाठविण्यात आले. त्यात १२ नमुन्यांमध्ये नोरोव्हायरस हा विषाणूसंसर्ग आणि ३ नमुन्यांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणूसंसर्ग आढळला असून, १९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. अद्याप ३९ नमुन्यांची तपासणी पूर्ण झालेली नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून बाधित भागांमध्ये तातडीने रुग्ण सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ‘जीबीएस’ची लक्षणे दिसून येणाऱ्या रुग्णांचा शोध आरोग्य विभागाची पथके घेत आहेत. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून ६४ हजार २३६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. महापालिका आणि आरोग्य विभागाने ८६ पथके यासाठी तैनात करण्यात आली आहेत.

पाणी पिण्यास अयोग्य

आरोग्य विभागाने २१ पाणी नमुने राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यातील ३ पिण्यायोग्य, ३ पिण्यास अयोग्य होते, तर १५ पाणी नमुन्यांचा तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने १८३ पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील १८२ नमुने पिण्यायोग्य आणि केवळ १ नमुना पिण्यास अयोग्य आढळला आहे. तसेच, अन्न व औषध प्रशासनाकडून परिसरातून खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जात आहे.

सोलापुरात एकाचा मृत्यू

‘जीबीएस’मुळे एका चाळीसवर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ते मूळचे धायरीतील होते. ते १३ जानेवारीला सोलापूरला गेले होते. त्यांना गिळण्यास त्रास होत होता आणि पायामध्ये अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांना १८ जानेवारीला सोलापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ५ दिवसांत २५ इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शन देण्यात आली. त्यांना २५ जानेवारीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान त्याच दिवशी मृत्यू झाला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 9 patients of gbs in a single day in maharashtra total number of patients up to 110 13 people on ventilator pune print news stj 05 ssb