लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: एनडीए चौकाची अडचण सुटल्यानंतर आता पुणे-कोलाड रस्त्यावरील अत्यंत महत्त्वाच्या भूगाव बाह्यवळण मार्गाची अडचण लवकरच दूर होणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यात दर्शविलेला १८ मीटर रुंद आणि ८०० मीटर लांबीच्या भूगाव बाह्यवळण मार्गासाठी ९५ टक्के जागामालकांनी जमीन देण्यास सहमती दर्शविली आहे.

या रस्त्यासाठी १.४४ हेक्टर जमिनीची गरज आहे. यासाठी एकूण ४१ जमीनमालकांची संमती आवश्यक आहे, त्यापैकी ३७ भूखंडधारकांनी चटई क्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स – एफएसआय) किंवा हस्तांतरण विकास हक्क (ट्रान्फरेबल डेव्हलपमेंट राइट्स – टीडीआर) मोबदल्यात जमिनीचा आगाऊ ताबा देण्याचे मान्य केले आहे. याबाबतच्या संमतीपत्रावर स्वाक्षरी केली आहे. हा रस्ता एनडीए चौक ते कोलाड (जिल्हा रायगड) या मार्गावरील वाहतूक कोंडी थांबविण्यासाठी महत्त्वाचा आहे.

हेही वाचा… तलाठी भरतीसाठी १० लाख ४० हजार अर्ज; अनेकांना दूरचे केंद्र

या जमिनीच्या भूसंपादनाचे काम पीएमआरडीए करणार असून, ही जागा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) सुपूर्द करणार आहे. त्यानंतर रस्ते महामंडळ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) मदतीने या रस्त्याचे काम करणार आहे. ९५ टक्के क्षेत्राचे संमतीपत्र पीएमआरडीएला प्राप्त झाल्याने लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे. परिणामी लवकरात लवकर भूगाव बाह्यवळणाच्या रस्त्याचे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे.

भूगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी जमीनमालकांची आगाऊ ताबा सहमती मिळाल्याने ही जागा लवकरच रस्ते महामंडळाला सुपूर्द केली जाईल. या रस्त्याचे काम सुरू होईल. त्यामुळे या रस्त्यावरील कोंडी कमी होण्यास निश्चित मदत होईल. – राहुल महिवाल, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 95 percent of land owners have agreed to give land for village bypass pune print news psg 17 dvr