पुणे : शहरातील दुकानांचे दरवाजा उचकटून चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला चंदननगर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.गणेश दगडू शिंदे (वय ३०. काळेवाडी, पिंपरी), यश सर्जेराव खवळे (वय १९, रा. भारतनगर, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आरोपींबरोबर गुन्हे करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिंदे, खवळे आणि अल्पवयीन साथीदारांनी चंदननगर, समर्थ तसेच लाेणीकंद परिसरातील आठ दुकानांचा लोखंडी दरवाजा उचकटून चोरी केली होती.
हेही वाचा : पुणे : २०१४ ला कोणी दगा फटका केला हे १२ कोटी जनतेला माहिती ; बावनकुळेंचा ठाकरेंना टोला
आरोपी मोटारीतून चंदननगर परिसरात आल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी सुभाष आव्हाड आणि नामदेव गडदरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून आरोपींना पकडले. चोरट्यांकडून आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. मोटार, दोन दुचाकी, कोयता, कटावमी, बॅटरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, सहायक निरीक्षक मनोहर सोनवणे, संभाजी गोलांडे, सुहास निगडे, नितीन लवटे, महेश नाणेकर आदींनी ही कारवाई केली.
