पुणे : ‘अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेतील ‘ब्लॅक बाॅक्स’ भारतातच असून, तपासणीसाठी अमेरिकेत पाठविला जाणार नाही,’ असे केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री किंजारापू राममोहन नायडू यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले. ‘विमान अपघात तपासणी विभाग (एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो – एएआयबी) ही संस्था कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘ब्लॅक बॉक्स’ची तपासणी करत आहे,’ असे ते म्हणाले.

भारतीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एफआयसीसीआय) यांच्यातर्फे हेलिकॉप्टर आणि लघुविमान या विषयावरील परिषदेनंतर नायडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या वेळी उपस्थित होते.

नायडू म्हणाले, ‘१२ जून रोजी झालेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनेत २४२ प्रवाशांचा मृत्यू झाला. विमानातील तांत्रिक बिघाडाची माहिती देणारा ‘ब्लॅक बाॅक्स’ १३ जून रोजी सापडला. दुर्घटनेच्या सखोल तपासासाठी केंद्रीय स्तरावर स्वतंत्र समितीही तयार करण्यात आली आहे. ‘ब्लॅक बाॅक्स’चे नुकसान झाले आहे. ‘एएआयबी’ या बाॅक्समधील आवश्यक माहितीची पुनर्प्राप्ती आणि विश्लेषण करता येईल किंवा नाही, याचा तपास करत आहे. ही तांत्रिक आणि संवेदनशील बाब आहे.’