पुणे : ‘राज्य करताना वेगवेगळे प्रसंग उद्धभवत असतात. त्यातून शांतपणे आणि सामोपचाराने मार्ग कसा काढता येईल, असा कायम प्रयत्न असतो. मात्र, समोरची लोक टपून बसलेली असतात. मुंबई येथे गेल्या पाच-सहा दिवसांमध्ये जे काही घडले त्यातून राजकीय फायदा मिळविण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. मात्र, आता उत्तर मिळाल्यानंतर सर्व गप्प झाले आहेत,’ अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर टीका केली.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनाबाबतची भूमिका स्पष्ट केली.
‘विरोधकांचे कमी उमेदवार निवडून आले. ते आपल्याला संधी कशी मिळेल, याकडे लक्षच ठेवून असतात. आंदोलनावेळी सर्व विरोधक माध्यमांसमोर म्हणणे मांडत होते. त्यांना उत्तर मिळाले आहे. आरक्षण मिळाल्यानंतर आता आरक्षणाबाबतच्या सरकारच्या निर्णयामुळे काय होईल, याची विनाकरण चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत कोणतीही शंका न घेता सर्व सुरळीत होणार आहे,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमताने निवडून दिले आहे. जनतेचा सहभाग, विश्वास आणि त्यांचा सर्वांगीण विकास हाच महायुतीच्या विकासाचा मार्ग आहे. जनतेला केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांचा फायदा द्यावा लागणार आहे. त्याचा फायदा जनतेला झाला पाहिजे. ही राज्य सरकारची भूमिका आहे.’
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबरपर्यंत
‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर ते जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे. या दरम्यान पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांवर सदस्यांची नियुक्ती झालेली असेल. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून सरपंचांना गावात चांगले काम करण्याची संधी आहे. त्यामुळे हे अभियान सामूहिक प्रयत्नांमधून यशस्वी करावे आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर येईल यासाठी प्रयत्न करावे,’ असेही अजित पवार यांनी सांगितले.