पुण्यात ४४ गावं कोविडमुक्त, अजित पवारांकडून संपूर्ण पुणे विभागात अभियान राबवण्याचे निर्देश

पुणे जिल्ह्यात यशस्वीपणे राबविलेले कोविडमुक्त गाव अभियान उपयुक्त आहे. पुणे विभागातही याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

पुणे जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने जिल्ह्यात यशस्वीपणे राबविलेले कोविडमुक्त गाव अभियान उपयुक्त आहे. पुणे विभागातही याची अंमलबजावणी करावी आणि अभियानाच्या माध्यमातून आपले गाव कोविडमुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी देखील सहभाग घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या कोविडमुक्त गाव अभियानाच्या जिल्हास्तरीय उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अजित पवार यांनी जिल्ह्यातील सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

अजित पवार म्हणाले, “मागील २ वर्षांपासून आपण कोविड संकटाशी मुकाबला करीत आहोत. हे मानवजातीवर आलेले संकट असल्याने सर्वांनी मिळून ही लढाई लढावी लागेल. नागरिकांनाही या आजाराबाबत गांभीर्य लक्षात आले आहे. २ वर्षात विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे संकट टाळण्यासाठी ग्रामविकास विभागाच्यावतीने कोविडमुक्त गाव करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ‘बिजेएस’च्या सहकार्याने पुण्यातील काही गावात राबविलेला हा उपक्रम यशस्वी ठरला. त्यामुळे तो  राज्यस्तरावर राबविण्याबाबत मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना कार्यक्रमाची माहिती देण्यात येईल.”

“महिलांनी-युवकांनी निश्चय केल्यास कोविडमुक्त गाव शक्य”

“कोणताही उपक्रम वैयक्तिक प्रयत्नाने यशस्वी होत नाही. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असते. ग्रामीण भारताची सूत्रं युवकांच्या हाती जात आहेत. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. महिलांनी आणि युवकांनी निश्चय केल्यास गाव कोविडमुक्त होऊ शकेल,” असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. कोविडमुक्त ४४ गावातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे अजित पवार यांनी अभिनंदन केले आणि जिल्ह्यातील नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.

हेही वाचा : राज्यामध्ये टाळेबंदी करणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, “रुग्णसंख्या वाढत आहे…”

प्रास्ताविकात शांतीलाल मुथा यांनी मोहिमेची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्ह्यातील ५५० गावांनी गाव कोविडमुक्त करण्यासाठी कृतीदलाची स्थापना केली. त्यांना बिजेएसतर्फे ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व गावात ही मोहीम राबविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. कोविडच्या पार्श्वभूमीवर आभासी (ऑनलाइन) पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बिजेएसचे शांतीलाल मुथा आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar direct administration to implement covid free village mission in pune division pbs

Next Story
नाना पाटेकर यांनी केलं अजित पवारांचं कौतुक; म्हणाले, “ते इमानाने गुपचूप काम….”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी