पिंपरी : ‘राज्य सरकार हे आगामी काळात सांस्कृतिक क्षेत्राला अधिक आर्थिक पाठबळ देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील नाट्यगृहे ही दर्जेदार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातून ग्रामीण भागातून चांगले कलाकार घडण्यास मदत होईल,’ असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ प्रयोगकला महोत्सवाचे शनिवारी पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आयुक्त शेखर सिंह, माजी उपमहापौर राजू मिसाळ, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, तृप्ती सांडभोर, माजी नगरसेवक अमित गावडे यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘मराठी भाषेसाठी राज्य सरकारने नवीन विभाग सुरू केला आहे. मराठी माणूस हा नाटकवेडा असून, त्यांनी नाट्यचळवळ जिवंत ठेवली आहे. मराठी नाटक हे खऱ्या अर्थाने समाजाचे प्रतिबिंब आहे. आगामी काळात सांस्कृतिक क्षेत्राला अधिक आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. ग्रामीण भागातील नाट्यगृह ही दर्जेदार असावीत, तेथे उत्तम सोयीसुविधा असाव्यात, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातून चांगले कलाकार घडण्यास मदत होईल.’

‘पिंपरी-चिंचवड आता केवळ औद्योगिक शहर म्हणून नव्हे सांस्कृतिक क्षेत्रामध्येही झपाट्याने वेगळी ओळख निर्माण करत आहे. ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ अशा महोत्सवाच्या माध्यमातून शहराची सांस्कृतिक पंढरी म्हणून ओळख निर्माण होत आहे.’ असे मत पवार यांनी व्यक्त केले.

‘शहरातील सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा ‘रंगानुभूती’ हा महोत्सव आहे. या महोत्सवात महाराष्ट्रासह राजस्थान, केरळ, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांतील कलाकार सहभागी झाले आहेत. हा महोत्सव ग. दि. माडगूळकर या नाट्यगृहात रंगत आहे, ही अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानाची बाब आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून नवकलाकारांना व्यासपीठ मिळत असून त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले जात आहे. शहरामध्ये अनेक कलाकार, दिग्दर्शक, लेखक, साहित्यिक, कवी घडत आहेत. मराठी रंगभूमीला समृद्ध करण्याचे काम या शहराने केले आहे.’ असेही ते म्हणाले.