राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली. राष्ट्रवादीतील फूटीनंतर अजित पवार गटातील नेत्यांनी थेट अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं. याने दोन्ही गटात तणावाचे संबंध निर्माण झाले आहेत. अशातच सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील शरद पवार यांची भेट घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी दिलीप वळसे-पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होते. या भेटीनंतर वळसे-पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

हेही वाचा : “धर्माची भाषा तुमच्या तोंडून शोभत नाही”, अजित पवार गटातील नेत्यानं आव्हाडांना सुनावलं; दिलं ‘हे’ आव्हान

दिलीप वळसे-पाटील म्हणाले, “ही पूर्वनियोजीत भेट होती. रयत शिक्षण संस्थेतील काही अडचणींबद्दल अध्यक्ष शरद पवारांबरोबर चर्चा झाली. या बैठकीत रयत शिक्षण संस्थेतील अन्य पदाधिकारीही होते. यावेळी अन्य कुठलीही चर्चा झाली नाही.”

हेही वाचा : “शरद पवारच खरे ओबीसी नेते, कारण…”, बच्चू कडूंचं विधान

अशा भेटींमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, याबद्दल प्रश्न विचारल्यावर वळसे-पाटलांनी म्हटलं, “कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याचं कारण नाही. वसंतदादा शुगर, रयत शिक्षण संस्था, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, राज्य कारखाना आणि राष्ट्रीय कारखाना संघ या संस्थांवर मी काम करतोय. येथे काम करताना नेहमीच शरद पवारांचं मार्गदर्शन घेत आलो आहे. आज सहकारी संस्थांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती संदर्भात सरकारने केलेल्या उपाययोजना याबद्दल शरद पवारांशी चर्चा केली.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar group dilip walase patil meet sharad pawar in modi bag pune rayat shikshan sanstha ssa