राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर अजित पवारांच्या नेतृत्वातील आमदारांचा मोठा गट भाजपा-शिंदे गटाबरोबर सत्तेत सहभागी झाला. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर आले. यावेळी भव्य रोड शोनंतर घेतलेल्या सभेत अजित पवारांनी मागे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सभा घेतल्याचं मान्य केलं. तसेच त्यामागील कारण सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले, “मित्रांनो ठीक आहे, मागे मीच मोदींविरोधात सभा घेतल्या होत्या हे मी मान्य करतो. कारण मला माहिती नव्हतं की, नंतरच्या काळात कसं काम होणार आहे. आज बारामती डोळ्यासमोर ठेवा. आज बारामती-फलटण रस्त्याचं काम मंजूर झालं आहे. हे ७०० कोटी रुपयांचं काम आहे असून चार पदरी रस्ता होणार आहे.”

“मी नितीन गडकरींना सांगितलं आणि त्यांच्याकडून मदत घेतली”

“भिगवण-बारामती काँक्रिट रस्त्याचं काम सुरू आहे. कुरकुंडवरून बारामतीला येण्याचा रस्ता चांगला केला. पाटसवरून बारामतीला येणारा पालखी मार्ग केला. तो रस्ता पाहिल्यावर म्हणाल की, हा रस्ता आहे की धावपट्टी आहे. एवढा प्रचंड मोठा रस्ता केला आहे. उंडवडीपासून रस्ता वळला की बारामतीपर्यंत रस्त्याला मला मदत करा असं मी नितीन गडकरींना सांगितलं आणि त्यांच्याकडून मदत घेतली. राज्य सरकारकडूनही मदत घेत आहे. तो चारपदरी रस्ता आपण करतो आहे. निरा ते बारामती पुढे इंदापूर हाही रस्ता मोठा करत आहोत. बारामतीहून माळेगावला जाताना रस्त्याचं काम सुरू आहे,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.

“मी पहाटे पाच वाजताच बावचळून उठतो”

अजित पवार पुढे म्हणाले, “हे सगळं मी करू शकलो, कारण तुमचा भरभक्कम पाठिंबा आहे. तुम्ही इतका बोजा खांद्यावर टाकता. विधानसभा निवडणुकीत १ लाख ६८ हजारांचं मताधिक्य दिलं. समोरच्यांचे सगळ्यांचे डिपॉझिट जप्त झाले. असं केल्यावर मी काय करायचं. त्यामुळे मी पहाटे पाच वाजताच बावचळून उठतो आहे. चला कामाला लागलं पाहिजे म्हणतो.”

हेही वाचा : पंतप्रधान मोदींवर शास्त्रज्ञांच्या कामाची प्रसिद्धी घेतल्याचा विरोधकांचा आरोप, फडणवीस म्हणाले…

“”बायको म्हणते दमाने-दमाने, हे काय चाललं आहे”

“बायको म्हणते दमाने, दमाने. हे काय चाललं आहे. जरा वयाचा विचार करा. मात्र, मला या कामातून वेगळंच समाधान मिळतं. आजची सभा झाल्यावर उद्याही मी पावणेसहा वाजता कुठल्यातरी साईटवर असेलच. तुम्ही मस्तपैकी चांगल्या झोपेत असताना मी साईटवर असेल. मी लवकर गेल्याने बारामतीकरांना त्रास होत नाही. मी १० वाजता साईटवर गेलो, तर तुम्ही इतकी गर्दी करता की, मला ते काम पाहताच येत नाही. त्यापेक्षा तुम्ही पांघरुणात झोपेत असतानाच काम बघून टाकायचं. म्हणजे त्या कामाविषयी सूचना देता येतात,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar on public rallies against pm narendra modi during election pbs