पुणे : आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवायची की युती, आघाडी म्हणून याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असला, तरी स्वबळावरच निवडणूक व्हावी, अशी अपेक्षा शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी ठेवली आहे. त्या दृष्टीने पक्ष संघटना मजबूत करण्याला प्राधान्य देण्यात आले असून, स्वबळाची चाचपणीही सुरू झाली आहे.
राज्यातील रखडलेली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक चार महिन्यांत घ्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महापालिका निवडणुकांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेनुसार पुणे महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे आगामी महापालिका निवडणूक होणार असून, त्यासाठी सन २०११ ची लोकसंख्या गृहीत धरली जाणार आहे.
मुंबईनंतर पुणे हे राज्यातील मोठे शहर आहे. त्या दृष्टीने महापालिकेची सत्ता राखण्यासाठी सर्वच पक्षांचा प्रयत्न आहे. त्यातही स्वबळावरच महापालिकेत सत्ता असावी, अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. मात्र निवडणूक महायुती किंवा महाविकास आघाडी म्हणून लढवायची, याबाबतच्या निर्णयाबाबत संदिग्धता आहे. त्यातही महायुतीमध्ये भाजपने स्वबळाचीच भूमिका घेतली असून, महाविकास आघाडीमध्ये अपवाद वगळता एकत्रित निवडणूक लढविण्याचा तूर्त मतप्रवाह आहे.
आगामी निवडणूक कशी लढायची याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. मात्र, भाजपने निवडून येणाऱ्या १२५ जागांची तयारी केली आहे. त्याबाबतची माहितीही वरिष्ठ नेत्यांना दिली आहे. – धीरज घाटे, भाजप, शहराध्यक्ष
पक्षाला ही निवडणूक महायुती म्हणून लढविण्याची इच्छा आहे. मात्र, अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील. – प्रमोद उर्फ नाना भानगिरे, शहरप्रमुख, शिवसेना (शिंदे)
महायुती म्हणून निवडणूक लढविली जाईल, असा विश्वास आहे. मात्र, तसा निर्णय न झाल्यास स्वबळाची तयारीही पक्षाने केली आहे.- सुभाष जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
महाविकास आघाडीचा विचार करता काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. पक्षवाढीसाठी महापालिका निवडणूक स्वबळावरच लढवावी, अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.- अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस
महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविण्यासंदर्भातच सध्या स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र, पक्ष नेतृत्वाने एकट्याने लढण्याचा निर्णय घेतल्यास त्या दृष्टीनेही तयारी करण्याची सूचना केली आहे.- प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढविण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर बैठका झाल्या आहेत. मात्र, आघाडी म्हणून आणि स्वबळावर लढल्यास काय फायदे-तोटे होतील, ही बाब पक्षाच्या नेत्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यानुसार ते योग्य निर्णय घेतील.– संजय मोरे, शहरप्रमुख, शिवसेना (ठाकरे)