चाकण ते आकुर्डी असा मोर्चा काढण्यात आला
पिंपरी- चिंचवड: चाकण एमआयडीसी वाहतूक कोंडीमुक्त व्हावी यासाठी आज पीएमआरडीवर ट्रॅफिकमुक्त कृती समितीकडून चाकण ते आकुर्डी असा भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चात नागरिकांसह खासदार अमोल कोल्हे, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी आढळराव पाटील हे देखील सहभागी झाले. मोर्चा संदर्भात महानगर आयुक्त योगेश म्हसे यांना निवेदन देण्यावरून खासदार अमोल कोल्हे आणि पोलिसांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली.
चाकण वाहतूक कोंडीमुक्त व्हाव यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी वेळोवेळी ठोस पावलं उचलली आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचा वाहतूक कोंडीच्या संदर्भात दौरा देखील झाला. परंतु, काही प्रमाणात बदल झाल्यानंतर परिस्थिती जैसे थे असल्याने ट्रॅफिकमुक्त कृती समितीकडून आज चाकण ते आकुर्डी पीएमआरडीएच्या कार्यलयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्यासह म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी आढळराव पाटील, स्थानिक आमदार देखील सहभागी होते.
शेकडोच्या संख्येने या मोर्चामध्ये नागरिक सहभागी झाले होते. पीएमआरडीएच्या कार्यालयाच्या जवळ मोर्चा येताच पोलीस आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात निवेदन देण्यावरून आणि मोर्चा अडवण्यावरून शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली. काही मिनिटानंतर अमोल कोल्हे यांच्यासह शिवाजी आढळराव पाटील यांना पीएमआरडीएच्या कार्यालयात सोडण्यात आलं. महानगर आयुक्त योगेश म्हसे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आलं आहे. चाकण वाहतूक कोंडीवर लवकरात लवकर योग्य मार्ग काढण्याबाबत पीएमआरडीएकडून आश्वासन देण्यात आल आहे.
पीएमआरडी कडून चाकण वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील खेड तालुक्यातील चाकण येथील औद्योगिक क्षेत्रातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी विविध रस्ते करणेबाबत. तसेच सदर कामांची स्वीकृत निविदांची छाननी सुरू आहे. सर्व प्रशासकीय मान्यता प्राप्त असलेल्या कामांची एकत्रित लांबी ४०.७४ किमी व रक्कम रु. ५५८.१२ कोटी इतकी असून सर्व कामे प्राधान्याने हाती घेण्यात आलेली आहेत.
१) निविदा प्रक्रिया पुर्ण करून तांत्रिक छाननी सुरु असणारी कामे
खेड तालुक्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री यांनी विशेष बाब म्हणून खालील कामास रु. १९६.५० कोटी इतक्या रकमेकरीता मान्यता दिली आहे.
रस्ता कामाचे नाव
१) धामणे फाटा ते जि.प. शाळा-कोये, २.०० किमी, ८.०० कोटीची मान्यता
२) कोहिंडे फाटा ते कडूस गावठाणपर्यंत, ५.६० किमी, २०.०० कोटीची मान्यता
३) कडूस गावठाण ते किवळे, ५.५० किमी, २०.०० कोटीची मान्यता
४) भोसे रा.मा.५५ ते वडगाव घेनंद, १.२० किमी, ५.०० कोटीची मान्यता
५) किवळे ते आंबेठाण ०.८९ किमी, ३.५० कोटीची मान्यता
६) देहू येलवाडी, २.५ किमी, १०४.०० कोटीची मान्यता
एकूण १७.६९ किमी अंतर असून १९६.५ कोटीची मान्यता
२) निविदा प्रसिद्धी स्तरावरील कामे
खेड तालुक्यातील मुख्य चाकण चौकातील वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी खालील रस्त्यांची सुधारणा करणेबाबत मागणी केली होती. सदर कामास रु. १००.१४ कोटी इतक्या रक्कमेची प्रशासकीय मान्यता प्राप्त असून प्राधिकरणामार्फत निविदा दि. ०८/१०/२०२५ रोजी प्रसिद्ध केली आहे.
रस्ता कामाचे नाव
१) मौजे चिखली ते मोई, १.७० किमी, १३.४२ कोटीची मान्यता
२) कुरुळी फाटा ते निघोजे, २.५० किमी, १५.५० कोटीची मान्यता
३) पुणे नाशिक रस्ता – आळंदी फाटा (चाकण)
ते आंळदी रस्ता, ४.०० किमी, २०.०० कोटीची मान्यता
४) पुणे नाशिक रस्ता – आळंदी फाटा (चाकण)
ते आळंदी रस्ता, ४.०० किमी, २०.०० कोटीची मान्यता
५) चऱ्हेाली खु. ते आळंदी, मरकळ रस्ता, २.०० किमी, १२.०० कोटीची मान्यता
६) निघोजे ते चाकण MIDC, १.५० किमी, ६.७२ कोटीची मान्यता
७) खालुब्रे ते MIDC फेज दोन, २.०० किमी, १२.५० कोटीची मान्यता
एकूण १७.७० किमी अंतर असून १००.१४ कोटीची मान्यता
३) भूसंपादन सुरु असलेले रस्ते
१) ३० मी. रुंदीचा तळेगाव-चाकण महामार्ग -५० हिंगणे चौक ते चाकण औद्योगिक वसाहत टप्पा ३ येथे वोल्कस्वॅगण कंपनी खराबवाडीला जोडणारा रस्ता. ०.९० किमी, २४.६५ कोटीची मान्यता
२) मौजे नाणेकरवाडी येथील सॅनी कंपनी ते रा.मा.६० येथील समृद्धी सीएनजी पंपला जोडणारा रस्ता. १.२ किमी, ३३.४० कोटीची मान्यता
३) मौजे मेदानकरवाडी, येथील रा.मा.६० येथील बंगला वस्ती चौक ते रा.मा. ५५ रासे फाटा पर्यंतचा रस्ता. २.५ किमी, १११.७५ कोटीची मान्यता
४) वेस्टर्न बायपास: पुणे-नाशिक NH 60, चाकण MIDC टप्पा-५ तसेच तळेगाव MIDC ते जुना मुंबई-पुणे महामार्गाला जोडणारा प्रमुख मार्ग) ०.७५० किमी, ९१.६८ कोटीची मान्यता
एकूण ५.३५ किमी अंतर असून २६१.४८ कोटीची मान्यता
वरील सर्व प्रशासकीय मान्यता प्राप्त असलेल्या कामांची एकत्रित लांबी ४०.७४ किमी व रक्कम रु. ५५८.१२ कोटी इतकी असून सर्व कामे प्राधान्याने हाती घेण्यात आलेली आहेत.
४) चाकण भागात केलेली निष्कासणाची कारवाई
तोडलेले अनाधिकृत बांधकामे : ३४७
निष्कासन कारवाई तोडलेले होल्डिंग : ८१
एकूण : ४२८
अशी माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली आहे.